Tunisha Case: ‘त्याने तिची फसवणूक केली असेल पण..’; तुनिशा आत्महत्या प्रकरणात उर्फीची पोस्ट चर्चेत
तुनिशा आत्महत्या प्रकरणात उर्फी जावेदचा शिझानला पाठिंबा; म्हणाली "तो चुकला असेल पण.."
मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिचा एक्स-बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली. शिझानने तुनिशाला लग्नाचं आमिष दाखवून फसवलं, असा आरोप तिच्या आईने केला. एकीकडे शिझान आणि तुनिशाच्या नात्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता अभिनेत्री उर्फी जावेदची पोस्ट चर्चेत आली आहे. उर्फीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये याविषयी भलीमोठी पोस्ट लिहित आपलं मत मांडलंय.
उर्फी जावेदची पोस्ट-
‘तुनिशा आत्महत्या प्रकरणी माझं मत- होय, तो चुकला असेल, त्याने तिची फसवणूक केली असेल पण तिच्या मृत्यूसाठी आपण त्याला दोष देऊ शकत नाही. ज्याला तुमच्यासोबत राहायचं नाही, त्याला तुम्ही सोबत राहण्यासाठी बळजबरी करू शकत नाही,’ असं तिने लिहिलंय.
‘मुलींनो, तुमचा मौल्यवान जीव देण्यालायक कोणीच म्हणजे कोणीच नसतं. सर्वकाही संपलंय असं कधीतरी वाटू शकतं, पण खरंच सर्वकाही संपलेलं नसतं. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा किंवा स्वत:वर थोडं आणखी प्रेम करण्याचा प्रयत्न करा. स्वत:चेच हिरो व्हा. थोडा वेळ घ्या. आत्महत्येनंतरही त्रास संपत नाही, जे लोक तुमच्या जवळचे असतात त्यांना अधिक त्रास असतो’, असा सल्ला तिने तरुणींना दिला आहे.
तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणात अटकेत असलेल्या शिझानला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं. चौकशीदरम्यान शिझान वारंवार त्याचा जबाब बदलत आहे आणि तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
तुनिशाशिवाय शिझानचे इतर महिलांसोबतही संबंध होते, असा आरोप अभिनेत्री आणि तुनिशाची मैत्रीण राया लबिबने केला होता. वासनेची भूक मिटवण्यासाठी त्याने शिझानने अनेक महिलांचा वापर केला, असा ती म्हणाली.