मुंबई : मॉडेल उर्फी जावेद कायम सोशल मीडियावर तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत अटकेची मागणी केली. याप्रकरणी उर्फीची शनिवारी पोलीस चौकशी देखील झाली. चौकशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्फीने नवीने फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
तोकड्या कपड्यांवरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फी जावेद हिने पोलीस चौकशीनंतर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. सध्या उर्फीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. दरम्यान उर्फीच्या फॅशनला काहींचा कडाडून विरोध आहे, तर काहीचं मात्र उर्फीला समर्थन आहे.
उर्फी जावेद विरोधात पोलीस केस
चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलिसांनी घेतली दखल, मॉडेलला पोलिसांनी नोटीस पाठवत शनिवारी चौकशीसाठी बोलावलं. यावेळी उर्फी म्हणाली, ‘मी स्वतंत्र नागरिक आहे. मला वेग-वेगळे कपडे घालायला मला प्रचंड आवडतात आणि संविधानामध्ये हा अपराध नाही. जेव्हा शूटसाठी बाहेर जाते तेव्हा पापाराझी माझे फोटो आणि व्हिडीओ बनवतात आणि ते व्हायरल होतात. यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही.
चित्रा वाघ यांचा उर्फीच्या कपड्यांना विरोध
र्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. शुक्रवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेतला. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी एक ट्विट करत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, असं म्हणत उर्फीच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर उर्फीने देखील चित्रा वाघ यांच्या ट्विटरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. एवढंच नाही, तर मॉडेलने चित्रा वाघ यांना ट्विट करत डिवचण्याचा प्रयत्न केला. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.