‘याहूनही वाईट घडलं असतं..’; भीषण अपघाताच्या 13 दिवसांनंतर उर्मिला कोठारेची पोस्ट
गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका मेट्रो कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर उर्मिला आणि तिचा कारचालक जखमी झाले होते. या घटनेच्या 13 दिवसांनंतर उर्मिलाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या ड्राइव्हरने गाडी भरधाव चालवून मेट्रोचं काम करणाऱ्या दोन कामगारांना धडक दिल्याची घटना 28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री घडली होती. या अपघातात सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा मृत्यू झाला, तर उर्मिलासह तिचा ड्राइव्हर गजानन पाल आणि कामगार सुजन रविदास जखमी झाले होते. या अपघाताच्या 13 दिवसांनंतर उर्मिलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती, तिची मुलगी आणि वडील गणपती बाप्पासमोर नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्मिलाने तिच्या कार अपघाताविषयी माहिती दिली आहे.
उर्मिला कोठारेची पोस्ट-
’28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12.45 वाजताच्या सुमारास माझ्या कारचा गंभीर अपघात झाला. पोईसर मेट्रो स्टेशनजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. तिथे मेट्रोचं काम सुरू होतं आणि मोठी यंत्रसामग्री, जेसीबी लोडर/एक्सकॅव्हेटर पार्क केलेले होते. माझा ड्राइव्हर गाडी चालवत होता. अचानक वळण आलं, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात मी आणि माझा ड्राइव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने आम्हाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. मुंबई पोलीस आणि डिलिव्हरी कर्मचारी पवन शिंदे यांचे मी आभार मानते. त्यांनी तात्काळ कारवाई केली आणि आम्हाला रुग्णालयात दाखल केलं. मी आता घरी आहे,’ असं तिने लिहिलंय.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘माझ्या पाठीला आणि बरगड्यांना अजूनही गंभीर दुखापत आहे. डॉक्टरांनी मला किमान चार आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. बाप्पाचे आभार, हे कितीही वाईट घडू शकलं असतं. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार ज्यांनी काळजी व्यक्त केली आणि मी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केल्या. हा एक गंभीर अपघात होता आणि माझ्या ड्राइव्हरविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे की न्याय मिळेल.’ पोलीस एफआयआरनुसारच हे स्टेटमेंट दिल्याचं तिने पोस्टच्या अखेरीस नमूद केलंय.
उर्मिलाच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘काळजी घे, नशिब तू सुखरुप आहेस’, असं एकाने लिहिलं. तर ‘पूर्ण आराम करा’, असा सल्ला दुसऱ्या युजरने दिला. ‘लवकरात लवकर बरी हो आणि शूटिंगला सुरुवात कर’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.