Urvashi Rautela | उर्वशी रौतेलाचा खोटारडेपणा समोर? परवीन बाबी यांच्या बायोपिकविषयी केली खोटी घोषणा?
उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत बायोपिकची घोषणा केली होती. ‘बॉलिवूड अपयशी ठरलं पण तुम्हाला गर्व वाटेल अशी कामगिरी मी करणार आहे’, असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला होता.
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. कधी तिच्या फॅशनमुळे तर कधी डेटिंगच्या चर्चांमुळे ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. काही दिवसांपूर्वी उर्वशीने तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली होती. दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं तिने जाहीर केलं होतं. मात्र आता त्या चित्रपटाविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. उर्वशीने परवीन बाबी यांच्या बायोपिकविषयी खोटं बोलल्याचं म्हटलं जात आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशीने परवीन बाबी यांच्या बायोपिकची घोषणा केली होती. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचं कळतंय.
उर्वशीला कोणत्याच प्रॉडक्शन हाऊसने अशा कोणत्या बायोपिकसाठी साइन केलं नसल्याचं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने असं काही म्हटलंच नव्हतं किंवा या बायोपिकच्या टीममधील कोणता निर्माता तिथे उपस्थित नव्हता, असं समजतंय. त्यामुळे उर्वशीने जो दावा केला आहे, त्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. एखादा कलाकार अशा पद्धतीने प्रोजेक्टची घोषणा करू शकत नाही, असंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. चित्रपटाचं काम सुरू होतं तेव्हा निर्माते किंवा दिग्दर्शक याबद्दलची घोषणा करतात.
View this post on Instagram
उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत बायोपिकची घोषणा केली होती. ‘बॉलिवूड अपयशी ठरलं पण तुम्हाला गर्व वाटेल अशी कामगिरी मी करणार आहे’, असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला होता. 22 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या निवासी सोसायटीच्या सचिवाने पोलिसांना सूचना दिली होती, की तीन दिवसांपासून परवीन बाबी यांच्या दारातील किराणा आणि वृत्तपत्र तसेच पडून आहेत. मृतदेह सापडण्याच्या 72 तासांआधीच तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. परवीन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नव्हतं. कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा त्यांच्या पोटात तीन दिवसांपासून अधिक काळ अन्नाचा एकही कण गेला नसल्याचं दिसून आलं होतं. परंतु काही प्रमाणात अल्कोहोल (शक्यतो औषधातून पोटात गेलेली) सापडली होती.