Rishabh Pant: ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाची खास पोस्ट; कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; म्हणाले "तो दुखापतग्रस्त असताना तू इथे.."
मुंबई: शुक्रवारी पहाटेच्या सुमारास क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला. देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत आली आहे. उर्वशीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
काय आहे उर्वशीची पोस्ट?
उर्वशीने इन्स्टाग्रामवर तिच्या एका फोटोशूटचा फोटो पोस्ट केला आहे. सुरुवातीला तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये फक्त दोन इमोजी पोस्ट केले होते. मात्र ट्रोल झाल्यानंतर तिने कॅप्शन एडिट केलं. तिकडे ऋषभ अपघातात जखमी झाला असताना तू फोटो काय पोस्ट करतेय, अशा शब्दांत चाहत्यांनी तिच्यावर टीका केली. त्यानंतर तिने कॅप्शन एडिट करत लिहिलं, ‘प्रार्थना करतेय.’
कॅप्शन एडिट केल्यानंतरही उर्वशीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. ‘या पोस्टमागचा उद्देश म्हणजे आरपीच्या (ऋषभ पंत) अपघातानिमित्त स्वत:कडे लक्ष वेधणं आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू कॅप्शन का एडिट केला’ असा सवाल दुसऱ्या युजरने केला.
View this post on Instagram
दिल्लीहून रुडकीला जाताना ऋषभच्या कारचा भीषण अपघात झाला. यावेळी ऋषभ स्वत: गाडी चालवत होता आणि कारमध्ये तो एकटाच होता. गाडी चालवताना डोळा लागल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जातंय. त्याची कार रेलिंगला जोरदार धडकली. अपघातानंतर कारला आग लागली. या अपघातात ऋषभच्या पाठीला, डोक्याला आणि पायांना दुखापत झाली.
उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत ‘आरपी’ असा उल्लेख केल्यापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. उर्वशीचा आरपी हा ऋषभ पंतच आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दोघांनी एकमेकांना सुनावलं होतं.