“सांताक्लॉजला पत्र लिहून सांगेन की..”; ख्रिसमसनिमित्त लीला, शिवा, पारूने सांगितल्या आपल्या इच्छा
ख्रिसमसनिमित्त प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधील मराठी अभिनेत्रींनी लहानपणीच्या खास आठवणी सांगितल्या आहेत. त्याचसोबत यावर्षी सांताक्लॉजकडे ते कोणती इच्छा मागणार आहेत, याविषयीही त्यांनी सांगितलं आहे.
ख्रिसमसला स्टॉकिंग्समध्ये आपल्या इच्छा लिहून रात्री दरवाज्या बाहेर किंवा ख्रिसमस ट्री खाली ठेवल्या की त्या इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. लहानपणी, शाळेत असताना ख्रिसमसला अशा प्रकारचं इच्छा पत्र अनेकांनी लिहिलं असावं. याबद्दल मराठी कलाकारांनीही काही आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. जर या वर्षी तुम्हाला सांताक्लॉजला पत्र लिहायचं असेल तर त्यात काय लिहाल, असा प्रश्न विचारला असता त्यांनी बऱ्यात गोष्टी सांगितल्या आहेत.
अभिनेत्री प्राप्ती रेडकर म्हणाली, “माझ्या आई-बाबांना आनंदात आणि सुखात ठेव. त्यांना माझा अभिमान वाटेल असं काम मला करत राहायचं आहे. त्यासोबत जर मला सरप्राइज म्हणून छान काही गिफ्ट मिळालं तर तेही आवडेल. मी कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहे, तिथे ख्रिसमस आवर्जून साजरा केला जातो. सुंदर सजावट केली जाते. कारण शाळेतच चर्चही होतं. शाळेत परफॉर्मन्स असायचे, ज्यात मला नेहमी एंजल किंवा मदर मेरीची भूमिका मिळायची. आम्ही कॅरल ही गायचो.”
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितिक्षा तावडेनं सांगितलं , “मी माझ्या ख्रिसमसच्या विशलिस्टमध्ये माझ्या घरच्यांना आणि नवऱ्याला द्यायला भरपूर वेळ मागेन. माझं शेड्युल अत्यंत बिझी चालू आहे. मी सांताक्लॉजकडून चांगल्या ठिकाणी एक छान आणि मोठा हॉलिडे मागेन. लहानपणीची ख्रिसमसची आठवण सांगावीशी वाटतेय, आमचे शेजारी ख्रिश्चन होते. त्यांच्याकडे दर वर्षी ख्रिसमस पार्टी असायची आणि त्यासाठी आम्ही खूप उत्साहित असायचो. 24 डिसेंबरला रात्री आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र त्यांच्याकडे जायचो. मस्त मेजवानी असायची. तिथे प्लम केक, इतर गोवन पदार्थ आणि तिथे छान देखावा बनवलेला असायचा तो बघायलाही मज्जा यायची. मग त्यांच्या प्रार्थना व्हायच्या, त्यानंतर गप्पा-गोष्टी, नाच आणि खेळ खेळायचो. खूप गोड आठवणी आहेत ख्रिसमसच्या.”
View this post on Instagram
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराज म्हणाली, “मी शाळेत असताना सांताक्लॉजला पत्र लिहायची. माझी ख्रिसमस विश ठरलेली असायची की मला एक पाळीव प्राणी हवं घरी, मग ते मांजर, कुत्रा कोणीही असू दे. आई नेहमी म्हणायची घरी पाळीव प्राणी नको, कारण त्यांची काळजी घ्यायला कोण नव्हतं. पण इतक्या वर्षांच्या माझ्या इच्छेला, आईनेच पूर्ण केले. मी नववीत असताना माझ्या आईने माझ्यासाठी पर्शिअन मांजर आणली. यावर्षी जर सांताक्लॉजला पत्र लिहायचं झालं तर मी लिहिन की माझी मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांना आवडतेच आहे पण आणखी खूप जास्त पसंतीस उतरू दे. दुसरी इच्छा अशी आहे की माझ्या आई -बाबांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे.”
View this post on Instagram
शरयू सोनावणे म्हणते, “मी सांताक्लॉजच्या विशलिस्टमध्ये लिहीन, जसं मी आता काम करतेय तसंच आयुष्यात पुढेही वेगवेगळं काम करण्याची संधी मिळत राहू दे. मला सदैव छान काम करण्याची हिंमत आणि ताकदही मिळू दे. लहानपणी मला असा वाटायचं की खरंच सांताक्लॉज येतो आणि गिफ्ट देतो. काही वर्षांनी मला कळलं की माझी आईच माझा सांताक्लॉज आहे. माझी आई मला विचारायची की तुला काय गिफ्ट हवं आणि मला नेहमी माझ्या मनासारख्या गोष्टी मिळायच्या. लग्नाच्या आधी माझी आई, माझा सांताक्लॉज होती. आता लग्न झाल्यानंतर माझा नवरा ही प्रथा पुढे नेतोय. माझी आई आणि नवरा हे दोघं माझ्या आयुष्यातले सांताक्लॉज आहेत.”
पूर्वा कौशिक म्हणाली, “ख्रिसमस भलेही आपल्यात साजरा केला जात नाही, पण मला ख्रिसमसही तितकाच आवडतो, कारण माझ्या काही ख्रिश्चन मित्र-मैत्रिणी आहेत. अंबरनाथला राहत असताना ते नेहमी ख्रिसमसला मला केक आणून द्यायचे. हे त्यांचं ठरलेलं असायचं. लहानपणीची आठवण अशी आहे की सांताक्लॉज येतो आणि मोज्यात चॉकलेट्स ठेवून जातो. मला ही संकल्पना खूप गोड वाटते. आता जर मला काही मागायचं झालं तर इतकंच मागेन की आतापर्यंत जे दिलं आहेस त्यासाठी मनापासून आभार. मला अनुभवातून खूप काही शिकायला मिळावं आणि माझ्या मेहनतीच्या प्रवासात सर्व माझ्यासोबत असावेत इतकीच इच्छा आहे.”
दिशा परदेशी म्हणाली, “ख्रिसमसच्या खूप आठवणी आहेत. कारण 25 डिसेंबरला माझ्या आई- बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. नाताळ हा आपला सण नाही, पण आम्ही जसं गणपती, दिवाळी, होळी साजरी करतो तितक्याच उत्साहाने ख्रिसमस ही साजरा करतो. कारण आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आम्ही ख्रिसमस ट्री सजवतो, घरी पूर्ण परिवार एकत्र येतो आम्ही सर्व भावंडं खूप मज्जा करतो. अजून एक खास गोष्ट 25 डिसेंबरची म्हणजे माझ्या घरी एक शीतझू डॉग आहे, तिचा ही जन्म 25 डिसेंबरचा. लहानपणी माझे बाबा माझे सांताक्लॉज होते.”