मुंबई- बॉलिवूड इंडस्ट्रीतून पुन्हा एकदा चाहत्यांना गुड न्यूज मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिला. त्यानंतर बिपाशा बासूच्या आयुष्यातही चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. आता अभिनेता वरुण धवन लवकरच बाबा होणार असल्याचं कळतंय. खुद्द सलमान खानने याबाबतची हिंट दिली. आपल्या आगामी ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन ‘बिग बॉस 16’च्या सेटवर पोहोचला होता. यावेळी सलमानने वरुणसमोर या ‘गुड न्यूज’चा उल्लेख केला.
भेडिया या चित्रपटात वरुण धवन आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन या कलाकारांकडून केलं जातंय. वरुण जेव्हा बिग बॉसच्या सेटवर पोहोचला, तेव्हा सलमानने थेट त्याच्या हातात एक सॉफ्ट टॉय दिलं आणि म्हणाला “हे बाळासाठी आहे”. हे ऐकून वरुणच्या चेहऱ्यावरही आनंद पहायला मिळाला. सलमानच्या या हिंटमुळेच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.
बिग बॉसच्या सेटवर गप्पांदरम्यान सलमानने वरुणच्या हातात एक खेळणं दिलं. त्यावर वरुणने विचारलं, “याचं मी काय करू?” सलमान लगेच म्हणाला, “हे तुझ्या बाळासाठी आहे.” सलमानच्या तोंडून हे ऐकताच वरुण लाजतो. “बाळ अजून आलं नाही”. त्यावर सलमान म्हणतो, “हे आलंय तर बाळसुद्धा लवकरच येईल.”
या दोघांमध्ये रंगलेल्या या चर्चेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून वरुणवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. वरुण धवनने बालमैत्रीण नताशा दलाल हिच्याशी जानेवारी 2021 मध्ये लग्न केलं होतं. कॉलेजमध्ये असल्यापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते.
वरुण धवन लवकरच ‘भेडिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 25 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिनेश विजन दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला.