Varun Dhawan | सुपरमॉडेलसोबतच्या ‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओवर अखेर वरुण धवनचं स्पष्टीकरण; म्हणाला..
अंबानींकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वरुण धवनने स्टेजवर परफॉर्म करताना जे केलं, ते पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मंचावर वरुण अचानक गिगी हदिदला किस करतो.
मुंबई : अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. नीता मुकेश अंबानींच्या सांस्कृतिक केंद्राच्या (NMACC) उद्घाटन कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमात स्टेजवर डान्स परफॉर्म करताना वरुणने असं काही केलं, ज्यामुळे नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीका होत आहे. या व्हिडीओमध्ये वरुणसोबत अमेरिकी सुपरमॉडेल गिगी हदिद पहायला मिळतेय. मंचावर परफॉर्म करणारा वरुण अचानक गिगीला बोलावतो आणि तिला उचलून घेतो. त्यानंतर ती जेव्हा स्टेजवरून उतरत असते तेव्हा तो तिच्या गालावर किस करतो. वरुणचं हेच वागणं नेटकऱ्यांना खटकलं आहे. आता ट्रोलिंगनंतर वरुणने ट्विट करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
नीता मुकेश अंबानींकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘कल्चरल सेंटर गाला’ कार्यक्रमाला देशातील आणि परदेशातील मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत बरेच कलाकार अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या चित्रपटात दिसले. शनिवारी रात्री स्टेजवर परफॉर्म करताना वरुण धवनने गिगी हदिदला मंचावर बोलावलं आणि तिला उचलून घेतलं. या व्हिडीओत तो तिला गालावर किस करतानाही दिसत आहे. वरुणचं हे वागणं योग्य नसल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
View this post on Instagram
‘हे खूपच अपमानकारक आहे. ती किती अनकम्फर्टेबल झाली हे स्पष्ट दिसतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘असं करण्याची काहीच गरज नव्हती. ज्याप्रकारे ती नंतर पळाली, ते पाहून असं वाटतंय की ती भारतात परत कधीच येणार नाही’, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘हेच वरुणच्या पत्नीसोबत कोणी केलं तर’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. ‘मंचावर सर्वांसमोर असं काही करण्याआधी किमान तिला विचारा तरी’, असंही युजर्सनी म्हटलंय.
I guess today you woke up and decided to be woke. So lemme burst ur bubble and tell u it was planned for her to be on stage so find a new Twitter cause to vent about rather then going out and doing something about things . Good morning ? https://t.co/9O7Hg43y0S
— VarunDhawan (@Varun_dvn) April 2, 2023
अशाच एका युजरच्या ट्विटवर अखेर वरुणने उत्तर दिलं आहे. गिगीला मंचावर बोलावणं हे आधीच ठरलं होतं, असं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. ‘मला असं वाटतं की आज तू झोपेतून जागी झालीस आणि आज तुझे डोळे उघडलेस. तर मी तुझ्या भ्रमाचा फुगा फोडतो आणि हे स्पष्ट करतो की ते सर्व तिच्यासाठी आधीच प्लॅन केलं होतं. तिला स्टेजवर आणण्याचं आधीच ठरवलं गेलं होतं. त्यामुळे बाहेर जाऊन गोष्टींबद्दल काहीतरी करण्याऐवजी ट्विटरवरच काहीतरी नवीन कारण शोधत बस. गुड मॉर्निंग,’ अशा शब्दांत वरुणने उत्तर दिलं.
कोण आहे गिगी हदिद?
गिगी हदिद ही डच-पॅलेस्टाइन मॉडेल आहे. जेलेना नौरा हदिद असं तिचं नाव आहे. लॉस एंजिलिसमध्ये तिचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं. तिने आजवर अत्यंत प्रतिष्ठित फॅशन शोजमध्ये हजेरी लावली असून प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहेत.