वरुण धवनच्या हातांवरच त्याने सोडले प्राण; अभिनेत्याला अश्रू अनावर, म्हणाला “मी रामायण वाचू लागलो..”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत वरुणने सांगितलं होतं की मनोजचं निधन कोरोना महामारीदरम्यान झालं होतं. मनोज कोरोनातून बरा झाला होता, मात्र त्याच्या आठवड्याभरातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचं निधन झालं होतं. या घटनेचा वरुणच्या मनावर खूप परिणाम झाला होता.
अभिनेता वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त वरुण विविध मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वरुण त्याच्या आयुष्यातील सर्वांत धक्कादायक घटनेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. वरुणसोबत 26 वर्षांपासून काम करणारा त्याचा ड्राइव्हर मनोज याच्या अकस्मात निधनाविषयी बोलताना तो भावूक झाला. “मनोजच्या निधनानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आणि आतापर्यंत माझ्या भोवती जो फुगा होता, तो अखेर फुटला,” अशा शब्दांत वरुण व्यक्त झाला.
त्याच्या निधनानंतर सर्वकाही बदललं
रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वरुणने सांगितलं, “आयुष्याचा बराच काळ मी एका भ्रमात राहत होतो. आयुष्य म्हणजे काय हे मला समजल्यासारखं वाटत होतं. पण मनोजच्या निधनाने सर्व गोष्टी पूर्णपणे बदलल्या. माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. वयाच्या पस्तीशीच्या आधीचा आणि नंतरचा वरुण धवन यात खूप फरक आहे. मी स्वत:कडे अत्यंत आदर्शवादी दृष्टीकोनातून बघायचो, की मी हिरो आहे. ऑनस्क्रीन मी हिरोची भूमिका साकारतो, त्यामुळे मी काहीही करू शकतो, असं मला वाटायचं. पण त्यादिवशी मी स्वत: अपयशी ठरलो.”
वरुणच्या डोळ्यांसमोर त्याने सोडले प्राण
ड्राइव्हरसोबतचा तो प्रसंग आठवताना वरुण धवनला अश्रू अनावर झाले. “मनोज माझ्या खूप जवळचा होता. बऱ्याच वर्षांपासून तो ड्राइव्हर म्हणून माझ्याकडे काम करत होता. एकेदिवशी अचानक काम करताना त्याने अखेरचा श्वास घेतला. मी त्याला सीपीआर दिला, आम्ही त्याला लिलावती रुग्णालयात घेऊन गेलो. तिथेही आम्ही वेळेत पोहोचलो होतो. आम्हाला वाटलं की आम्ही एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. पण त्याने माझ्या हातांवर असतानाच प्राण सोडले होते. तो इतक्या सहजपणे गेला, हे डोळ्यांसमोर पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं”, असं त्याने पुढे सांगितलं.
वरुणच्या आयुष्यावर परिणाम
मनोजच्या निधनाचा वरुणच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही परिणाम झाला. “तुम्ही पाहिलंत, तर माझं कामसुद्धा कमी झालं आहे. दोन वर्षांनंतर माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे. बेबी जॉन हा माझा चित्रपट दोन वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मनोजच्या निधनाचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला”, असं वरुण म्हणाला.
या दु:खातून सावरण्यासाठी वरुणने धार्मिक पुस्तकांचा आधार घेतला. ‘रामायण’, ‘भगवदगीता’ यांसारखी पुस्तकं तो वाचू लागला. याविषयी त्याने सांगितलं, “एक माणूस म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जावं लागतं, हे मला समजलं. अशा घटना तुम्हाला हादरवून सोडतात पण तुम्ही एकाच जाही स्थिर नाही राहू शकत. मी भगवदगीता, महाभारत आणि रामायण वाचू लागलो. हा बदल माझ्यात सहजच झाला. कारण माझ्या मनात खूप प्रश्न होते.”