Ved | रितेश – जिनिलियाची सुपरहिट लव्ह स्टोरी ‘वेड’ आता ओटीटीवर; ‘या’ दिवशी पाहू शकणार चित्रपट
या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील जिनिलियाचा सहज अभिनय आणि प्रसन्न वावर प्रेक्षकांना खूपच भावला.
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. डिसेंबरमध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला हाऊसफुल प्रतिसाद दिला होता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेड या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने देशभरात 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मराठी चित्रपटाच्या दृष्टीने ही सर्वाधिक कमाई होती. तर मार्च महिन्यापर्यंत ‘वेड’ने देशात 61 कोटी रुपयांची कमाई केली होती. रितेश-जिनिलियाच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि जगभरात त्याने 73 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले होते. सैराटनंतर रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला. आता हा चित्रपट येत्या 28 एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉटस्टारवर हा चित्रपट मराठी तसंच हिंदी भाषेतही पहायला मिळणार आहे. ‘वेड’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ तेलुगू चित्रपटात नाग चैतन्य आणि समंथा या तत्कालीन रिअल लाइफ जोडीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
View this post on Instagram
रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटाचं बजेट 15 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट हाऊसफुल होता. समिक्षकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील जिनिलियाचा सहज अभिनय आणि प्रसन्न वावर प्रेक्षकांना खूपच भावला. प्रेमात माणूस वेडा होतो की जगावेगळी माणसं असं वेडं प्रेम करतात, अशा दोन्ही पद्धतीचं प्रेम ‘वेड’ चित्रपटात पहायला मिळतं.