‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती, व्यंकटेश डग्गुबतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
'बाहुबली' या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबती, त्याचे काका आणि अभिनेते व्यंकटेश डग्गुबती आणि इतर कुटुंबीयांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे.. ते जाणून घेऊयात..
तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राणा डग्गुबती, निर्माते डी. व्यंकटेश आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादमधील फिल्मनगर इथल्या एका मालमत्तेच्या पाडकामाच्या संदर्भात ही तक्रार आहे. या तक्रारीत चित्रपट निर्माते डी. सुरेश बाबू, त्यांचा भाऊ आणि अभिनेता डी. व्यंकटेश आणि कुटुंबातील दोन सदस्य, राणा डग्गुबती आणि अभिराम डग्गुबती यांच्या नावाचा उल्लेख आहे. के. नंदुकुमार नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. भाडेतत्त्वावर घेतलेली मालमत्ता बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा कट रचल्याचा आरोप नंदुकुमार यांनी केला आहे.
हे प्रकरण फिल्म नगरमधील डेक्कन किचन हॉटेलच्या पाडकामाशी संबंधित आहे. डग्गुबती कुटुंबाने फिल्म नगरमधील त्यांची मालमत्ता नंदुकुमार यांना भाड्याने दिली होती. भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर नंदुकुमार हे डेक्कन किचन नावाचं हॉटेल चालवत होते. मात्र भाडेपट्टा करारावरून डग्गुबती कुटुंबीय आणि नंदुकुमार यांच्यात वाद निर्माण झाला असून त्यामुळे कायदेशीर संघर्ष निर्माण झाला आहे.
तक्रारदाराच्या मते त्यांनी आरोपींकडून फिल्मनगरमधील मालमत्ता भाडेतत्त्वावर घेतली होती आणि त्याच्या नूतनीकरणासाठी जवळपास वीस कोटी रुपये गुंतवले होते. वैध भाडेपट्टा करार असूनही आरोपीने त्यांना मालमत्तेतून बाहेर काढण्याचा कट रचल्याचा आरोप नंदुकुमार यांनी केला. इतकंच नव्हे तर मालमत्तेचा काही भाग पाडण्यासाठी आरोपीने समाजविरोधी घटकांना कामावर ठेवलं आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना धमकी दिल्याचाही आरोप नंदुकुमार यांनी केला आहे.
फिल्मनगरमधील ही प्रॉपर्टी 2014 मध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आली होती आणि गेल्या काही वर्षांत भाडेपट्टा करारांचं नूतनीकरण करण्यात आलं. न्यायालयाच्या आदेशानुसार नंदुकुमार यांनी मालमत्तेचा ताबा कायम ठेवल्याचं म्हटलंय. मात्र या आदेशांना न जुमानता आरोपींनी 2024 मध्ये अनेक वेळा मालमत्तेत प्रवेश केला आणि ती पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. तक्रारदार नंदुकुमार यांनी असंही म्हटलंय की त्यांनी यापूर्वीही पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 448, 452, 458 आणि कलम 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.