Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची तब्येत खालावली असून त्यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मे महिन्यातही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. व्यायाम करताना अचानक पाठीत दुखू लागल्याने त्यांना मे महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. “प्रत्येकाला आपली क्षमता काय आहे हे माहित असावं आणि त्यानुसारच त्याने कामं करावीत. क्षमतेपेक्षा अधिक काहीच करू नये,” असं ते म्हणाले या व्हिडीओत म्हणाले होते. अभिनेते धर्मेंद्र हे 86 वर्षांचे आहेत.
धर्मेंद्र यांचं खरं नाव धरम सिंग देओल आहे. त्यांच्या वडिलांचं नाव केवल किशन सिंह देओल आणि आईचे नाव सतवंत कौर आहे. धर्मेंद्र यांचं बालपण साहनेवाल गावात गेलं. जवळपास सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट गावापासून मैलो दूर असलेल्या थिएटरमध्ये जाऊन पाहिला आणि ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी चित्रपटांमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ‘दिल्लगी’ हा चित्रपट 40 हून अधिक वेळा पाहिला होता.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
धर्मेंद्र यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 1960मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाने झाली. पण त्यांना ‘फूल और पत्थर’ या चित्रपटामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी ते रेल्वेत नोकरी करत होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या सहा दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत ‘सत्यम’, ‘बंदिनी’, ‘शोले’, ‘जुगनू’, ‘अनुपमा’, ‘धर्मवीर’ आणि ‘चुपके-चुपके’ असे अनेक उत्तम चित्रपट केले. धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वीच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. यामध्ये जया बच्चन, शबाना आझमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याही भूमिका आहेत. पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.