मुंबई : 15 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील वाद काही थांबेनात. वीकेंड का वार एपिसोडमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने विकीची चांगलीच शाळा घेतली. नॅशनल टेलिव्हिजनवर तुझी आई अंकिताला बरंवाईट बोलत असताना तू तिची बाजू का घेतली नाही, असा सवाल करणने विकीला केला. त्यानंतर विकीने अंकिताला विचारलं की त्याची आई तिला नेमकं काय म्हणाली? जेव्हा अंकिताच्या तोंडून विकी संपूर्ण घटना ऐकतो, तेव्हा तो पुन्हा तिच्यावरच चिडतो.
विकी अंकिताला म्हणतो, “तुझे वडील काय म्हणाले असते? त्यांना हे सर्व आवडलं असतं का? मला असं वाटतंय की माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांना चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत. तुझं कुटुंब हे सर्व सहन करतंय, अशी प्रतिमा निर्माण केली जातेय. माझ्या कुटुंबीयांनी कधीही तुझ्या करिअरमध्ये, आपल्या आयुष्यात किंवा तू कोणते कपडे परिधान करतेस आणि कशी राहतेस या सर्वांत अडथळा आणला का?” विकीच्या या प्रश्नांना अंकिता नकारार्थी उत्तर देते.
“आपल्या दोघांच्या आईने आपल्याला अशा पद्धतीने भांडताना किंवा वागताना कधीच पाहिलं नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटतंय. मला तुझ्या घरात खूप प्रेम आणि आदर मिळाला. पण या भांडणांमुळे मला ते गमवायचं नाही. म्हणूनच मी तुझ्या कुटुंबीयांची माफी मागतेय. मी हजार वेळा माफी मागायला तयार आहे”, असं अंकिता विकील म्हणते. टीव्हीवर गोष्टी कशा पद्धतीने दाखवल्या जात आहेत आणि अंकिता बिग बॉसच्या घरात कशी वागतेय, यावरून विकी पुन्हा तिला सुनावत असतो.
“मी तुला किती वेळा सांगितलंय की गोष्टी कशा पद्धतीने दाखवल्या जात आहेत. एखाद्या घटनेवर कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी आणि त्याचे परिणाम काय होतील हे तुला समजलं पाहिजे. गेल्या चार-पाच वर्षांत माझ्या कुटुंबीयांनी कधीच आपल्या लग्नाबद्दल काहीच म्हटलं नव्हतं. त्यांनी आपल्यावर कोणतीच बंधनं लादली नाहीत. तू बिलासपूरला नाही गेलीस तरी माझ्या कुटुंबीयांनी कधीच तुझ्यावर बळजबरी केली नाही. माझ्या कुटुंबीयांनी कधी तुझ्याकडून कोणती अपेक्षा केली का?”, असा सवाल तो अंकिताला करतो.
यापुढे बोलताना विकी अंकिताच्या भूतकाळातील रिलेशनशिपचा उल्लेख करतो. “जेव्हा मी तुझ्या घरी राहायला आलो तेव्हा एखाद्या श्रीमंत जावयासारखा किंवा मुलासारखा राहिलो का? तुझ्या आणि तुझ्या कुटुंबीयांच्या लाइफस्टाइलनुसार मी स्वत:ला बदलून घेतलं. जेव्हा मी तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा सुशांतसोबतचं (सुशांत सिंह राजपूत) तुझं नातं नॅशनल टेलिव्हिजनवर जगजाहीर होतं. त्या सर्वांची झळ मला सहन करावी लागली. ते सर्व मी स्वत:वर ओढवून घेतलं. तुला जर माझ्याकडून काही समस्या असती तर तू लग्नच केलं नसतं. तू स्वत:ला लग्नाचा निर्णय घेतलास. मी तुझ्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत नेहमीच उभा होतो”, अशा शब्दांत विकी व्यक्त होतो.
विकीचं ऐकल्यानंतर अंकिता त्याला म्हणते की माझ्यासाठी लग्न आणि कुटुंबाशिवाय अधिक काहीच महत्त्वाचं नाही. अंकिता पुन्हा पुन्हा विकीची माफी मागते. मात्र विकी ऐकण्यास तयार नसतो. तो पुढे सुनावतो, “माफीने काहीच बदलणार नाही. इथे प्रतिमा मलिन होतेय. एक मुलगा म्हणून मी तुझ्या आणि कुटुंबीयांच्या पाठिशी होतो.” त्यावर अंकिता म्हणते की, “मीसुद्धा या नात्याला 100 टक्के दिले आहेत.” अंकिताला थांबवत विकी म्हणतो, “तू बिलासपूरमध्ये माझ्या घरी दहा दिवससुद्धा गेली नव्हतीस. तू मुंबईतच राहिलीस आणि तुझं आयुष्य जगलीस.”