छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा जबरदस्त लूक; ‘छावा’ची प्रचंड उत्सुकता
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाच्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक झाला आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
आपल्या दमदार अभिनयकौशल्यामुळे ओळखला जाणारा अभिनेता विकी कौशलला अनेक दिग्दर्शकांकडून मागणी आहे. त्याच्या खात्यात सध्या अनेक मोठमोठ्या चित्रपटांचे प्रोजेक्ट्स आहेत. त्यापैकीच बहुचर्चित प्रोजेक्ट आहे ‘छावा’. या चित्रपटासाठी त्याने बरीच मेहनत घेतली असून त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहणं थक्क करणारं असेल. या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू असून त्यातील विकीचा सेटवरील लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे. त्याचा हा अप्रतिम लूक पाहिल्यानंतर चित्रपटाविषयी प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.
मोठे केस, दाढी, कपाळावर टिळा, गळ्यात माळ… अशा त्याच्या या दमदार लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या फोटोमध्ये विकीच्या मागे जंगलाची पार्श्वभूमी पहायला मिळतेय. त्यामुळे हा प्रशिक्षणाचा एखादा सीन असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. त्यांच्यासोबत विकीचा हा दुसरा चित्रपट असेल. याआधी दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
पहा विकी कौशलचा लूक-
#VickyKaushal Is True Chameleon 🙌
These images from #Chaava set, where @vickykaushal09 captured as #ChhatrapatiSambhajiMaharaj is the proof of dedication and conviction 💯
The long beard, moustache and grown hair shows his commitment. 👏 pic.twitter.com/EtE9imxY4i
— Ashwani kumar (@BorntobeAshwani) April 23, 2024
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं होतं की छत्रपती संभाजी महाराज यांची कथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी ते उत्सुक आहेत. “आपण आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट पाहिले आहेत. मात्र छत्रपती संभाजी महाराज हेसुद्धा मोठे योद्धा होते. मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे”, असं ते म्हणाले. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे.