अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणणारा ‘छावा’चा तो सीन शूट करणारा दिग्दर्शक कोण? ऐकून अभिमान वाटेल
विकी कौशलने 'छावा' सिनेमातील शेवटचा सीन शूट करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. हा सीन कोणत्या अॅक्शन दिग्दर्शकाने शूट केला हे ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल.

सध्या सर्वत्र अभिनेता विकी कौशल आणि त्याच्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. चार दिवसांमध्येच हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. थिएटरमधून बाहेर पडणारे प्रेक्षक हे विकीच्या अभिनयाची प्रशंसा करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर देखील थिएटरमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये प्रेक्षक भावूक झाल्याचे दिसत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटातील प्रत्येक अॅक्शन सीन देखील विकी कौशलने स्वत: शूट केला आहे. कोणत्याही बॉडी डबलचा वापर करण्यात आलेला नाही. याविषयी स्वत: अॅक्शन डायरेक्टरने खुलासा केला आहे.
‘छावा’ चित्रपटातील अॅक्शन सीन्सचे दिग्दर्शन हे परवेज शेख यांनी केले आहे. नुकताच परवेज यांनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना बेड्यांमध्ये बांधतो तो भावूक सीन कसा शूट करण्यात आला हे देखील सांगितले आहे. विकी कौशल हा प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक शाम कौशल यांचा मुलगा आहे. साहजिकच प्रत्येक अॅक्शन सीन्समधील बारकावे पाहाणे हे विकीच्या रक्तात आहे.विकीने पहिल्यांदा अॅक्शन सिनेमा शूट केला आहे.
स्वतः ॲक्शन सीन शूट केले




विकीने ‘छावा’ सिनेमातील अॅक्शन सीन स्वत: शूट केले आहेत. त्याने बॉडी डबल वापरण्यास नकार दिला होता. परवेझ शेखने विकी कौशलचे कौतुक करत म्हटले की, ‘विकीने स्वत: अॅक्शन सीन्स शूट केले आहेत. तो आम्हाला परफेक्ट शॉटसाठी हवे तितके टेक देत होता. ‘छावा’सारखा मोठा ॲक्शनपट त्याने कधीच केला नव्हता. आम्ही विकीला सांगितले की कठीण अॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबलचा वापर करू आणि वाइड शॉट घेऊ. पण त्याने सर्व ॲक्शन सीन्स स्वतः करण्याचा आग्रह धरला.’
भावनिक सीन कसा शूट झाला?
परवेज शेख यांनी या मुलाखतीमध्ये चित्रपटातील शेवटच्या भावनिक सीन विषयी देखील सांगितले आहे. चित्रपटात औरंगजेब (अक्षय खन्ना) छत्रपती संभाजी महाराज (विकी कौशल) यांना साखळदंडात बांधून ठेवतो. या दृश्यात विकी कौशलचे हातपाय बांधलेले असून तो रक्तबंबाळ झालेला दिसत आहे. या सीनविषयी बोलताना परवेज म्हणाले, ‘जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना साखळदंडांनी बांधलेले दृश्य आम्ही शूट करत होतो, तेव्हा त्याला 2-3 तास साखळदंडामध्ये उभे रहावे लागले होते. ते शॉट्स दिवसा तसेच रात्री चित्रित करण्यात आले. त्यामुळे विकीचे शरीर दुखत होते. त्याच्या पायाचे स्नायू दुखू लागल्यामुळे शुटिंग थांबवण्यात आले. विकीसाठी शूट थांबवण्यात आले होते.’