कोणाला कधी राग येईल..; राजकारणाविषयी काय म्हणाली विद्या बालन?
अभिनेत्री विद्या बालनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकारणावर भाष्य करण्यास नकार दिला. यामागे तिने तिचं कारणसुद्धा सांगितलं. राजकारणाची भीती वाटत असल्याचंही तिने म्हटलंय.
अभिनेत्री विद्या बालनने आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला. बॉलिवूडमध्ये विद्याने अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांसोबतच विद्या तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला राजकारणाविषयी मत मांडण्यास सांगितलं असता तिने त्यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. राजकारणाविषयी काहीही बोललो तरी त्यावरून ट्रोलिंग आणि बॉयकॉट केलं जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली. तेसुद्धा एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी व्यक्त झालो, तर त्या चित्रपटासाठी काम केलेल्या 200 लोकांच्या मेहनतीवरही पाणी फेरलं जातं, असं ती म्हणाली.
या मुलाखतीच्या सुरुवातीलाच विद्याने राजकारणाविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. “मला राजकारणाची खूप भीती वाटते. आम्ही काही बोललो आणि त्यावरून तुम्ही आम्हाला बॅन वगैरे केलात तर? सुदैवाने माझ्यासोबत असं काही घडलं नाही. पण आता कलाकार राजकारणावर बोलण्यास घाबरतात, कारण कधी कोणाचं मन दुखावेल हे सांगता येत नाही. खासकरून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी तर नाहीच. कारण त्यामागे 200 लोकांची मेहनत असते आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरायला नको. त्यामुळे मी राजकारणापासून लांबच राहते”, असं तिने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांविरोधात बहिष्काराची मोहीम चालवण्यात आली. चित्रपटातील एखाद्या कलाकाराने राजकीय भूमिका घेतल्यास, त्यावरून नेटकऱ्यांनी थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. याचाच संदर्भ देत विद्याने राजकीय मत व्यक्त करण्यास नकार दिला. आपल्या वक्तव्याचा अर्थ कसा काढला जाईल आणि त्यावरून कशी ट्रोलिंग होईल, हे सांगता येत नाही, असं ती म्हणाली.
याविषयी ती पुढे म्हणाली, “हे सर्व सोशल मीडियामुळे होतं. तुमच्या प्रत्येक गोष्टीवरून लोक आक्षेप घेऊ लागतात. त्यांना ज्या घटनेविषयी माहितसुद्धा नसतं, त्यावरही ते मतं मांडायला उत्सुक असतात. त्यामुळे तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवून काम करत राहणंच चांगलं आहे.” विद्याच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास तिचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये तिने प्रतिक गांधीसोबत स्क्रिन शेअर केला आहे.