एवढी मोठी चूक कशी काय? ‘झी मराठी’वर भडकले नेटकरी
झी मराठी वाहिनीवर 12 फेब्रुवारीपासून दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र पहिल्याच दिवशी गोंधळ झाल्याने प्रेक्षक वाहिनीवर चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. एवढी मोठी चूक कशी झाली, असा सवाल काहींनी केला आहे.
मुंबई : 14 फेब्रुवारी 2024 | छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करतात. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये कोणता ट्विस्ट येतोय, हे पाहण्यासाठी ते खूपच उत्सुक असतात. मालिकांशी खूप मोठा प्रेक्षकवर्ग जोडला गेला आहे. त्यामुळे एपिसोडमध्ये काही गडबड झाली तर प्रेक्षकांकडून लगेच नाराजी व्यक्त होते. असंच काहीसं सध्या ‘झी मराठी’ वाहिनीबाबत घडलंय. 12 फेब्रुवारीपासून या वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. ‘पारू’ आणि ‘शिवा’ अशी या मालिकांची नावं आहेत. ठरलेल्या तारीख आणि वेळेप्रमाणे ‘पारू’ या मालिकेचा पहिला एपिसोड 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित करण्यात आला. यानंतर ‘शिवा’ या मालिकेच्या पहिल्या एपिसोडदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे या मालिकेचं प्रक्षेपण रखडलं आणि त्याऐवजी जवळपास 10 ते 15 मिनिटं जुने प्रोमो प्रेक्षकांना पाहावे लागले.
शिवा या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा फडके यांच्या मुख्य भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे विविध प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. 12 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित होणार होता. मात्र ऐनवेळी तांत्रिक कारणांमुळे प्रेक्षकांना एपिसोडऐवजी प्रोमो बघावे लागले. या गोंधळामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झाली. अखेर सोशल मीडियावर त्यांनी संताप व्यक्त केला. शाल्व आणि पूर्वाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मालिकेचे प्रोमो शेअर केले होते. त्यावर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
View this post on Instagram
एवढी मोठी चूक कशी काय झाली, असा सवाल एकाने केला. तर ‘इतकी प्रतीक्षा केल्यानंतर ऐनवेळी गोंधळ घातला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा तांत्रिक बिघाड खूप महागात पडेल आता. पहिल्या एपिसोडच्या रेटिंगमध्ये घसरण होईल’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. या टीकांदरम्यान अद्याप झी मराठी वाहिनी किंवा कलाकारांकडून कोणतंच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
झी मराठीची नवीन मालिका ‘शिवा’ ही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. शिवाचा लूक असो किंवा बिनधास्त स्वभाव लोकांना सगळंच आकर्षित करत आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी पूर्वाने सांगितलं, “मी CHM कॉलेज उल्हासनगरला शिकत असल्यापासूनच एकांकिका करत असल्यामुळे, राज्य नाट्य, कमर्शिअल नाटकं केली आहेत. त्यानंतर छोट्या पडद्यावर आले. थिएटर केल्यामुळे खूप गोष्टी वेगळ्याने जाणवल्या. शास्त्रीय नृत्यामध्ये माझा डिप्लोमा झाला आहे. मी काही महिन्यापासून कामाच्या शोधात होते आणि काम शोधत असताना ठरवलं होतं की नायिकेची भूमिका साकारायची. एक दिवस अचानक मला माझ्या सोशल मीडिया वर ‘जगदंब प्रॉडक्शन’मधून मेसेज आला की ‘तू ऑडिशनला येऊ शकशील का?’ तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला नायिकेची भूमिका आहे का?’ हो म्हटल्यानंतर तिथून गोष्टी घडत गेल्या आणि माझा ‘शिवा’चा प्रवास सुरु झाला.”