“मलायकाच्या कुटुंबीयांप्रती थोडीतरी दया दाखवा..”; कोणावर भडकला अभिनेता?
अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता हे वांद्रे इथल्या आयेशा मनोर या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत होते. त्यांनी बुधवारी सकाळी मुंबईच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता बुधवारी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या इमारतीखाली मृतावस्थेत सापडले. त्यांनी सहाव्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मलायकाचे सावत्र वडील अनिल अरोरा हे अनिल मेहता म्हणून प्रचलित होते. ते वांद्रे इथल्या आयेशा मनोर या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मलायकाच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि पूर्व पती-अभिनेता अरबाज खानने वांद्रे इथल्या घरी भेट दिली. पापाराझी अकाऊंटवर या सर्व घडामोडींचे व्हिडीओ सतत पोस्ट केले जात आहेत. मलायका आणि तिच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत नाजूक असल्याने त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचा सल्ला याआधी नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे दिला होता. आता एका बॉलिवूड अभिनेत्याने याविषयी संतप्त पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता विजय वर्माने एक्स अकाऊंटवर पापाराझी आणि माध्यमांना उद्देशून लिहिलंय, ‘दु:खात असणाऱ्या कुटुंबाला कृपया एकटं सोडा. हा क्षण त्यांच्यासाठी फार कठीण आहे. मीडियावाल्यांनी थोडीतरी दया दाखवा.’ याआधी अभिनेता वरुण धवननेही पापाराझींना फटकारलं होतं. ‘ज्यांनी आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलंय, त्यांच्या चेहऱ्यावर अशा पद्धतीने कॅमेरे धरणं अत्यंत असंवेदनशील आहे. तुम्ही लोक काय करत आहात किंवा जेव्हा तुम्ही असं वागता तेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर कोणतं दु:ख असतं याचा कृपया एकदा विचार करा. हे तुमचं काम आहे मी समजू शकतो पण कधीकधी समोरची व्यक्ती या सर्व गोष्टींना सामोरं जाण्यास तयार नसते’, असं वरुणने लिहिलं होतं.
Pls leave the grieving family alone.. it’s not easy anyway for them. Thoda toh grace rakho media walon 🙏🏻
— Vijay Varma (@MrVijayVarma) September 12, 2024
घटना घडली त्यावेळी घरात मलायकाची आई जॉईस आणि सावत्र वडील अनिल हे दोघेच होते. ते काही काळ एकत्र बोलत बसले होते. त्यानंतर अनिल तिथून उठले आणि गच्चीच्या दिशेने गेले. बराच वेळ परत न आल्यामुळे जॉईस तिथे गेल्या. त्यावेळी त्यांना पतीच्या चपला सापडल्या. त्यांनी टेरेसवरून वाकून पाहिलं असता ते खाली पडलेले दिसले. त्यावेळी इमारतीचा सुरक्षारक्षकही मदतीसाठी ओरडत होता, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. अनिल हे मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होते. काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली असल्याचंही म्हटलं जातंय.