विकास सेठीच्या निधनाचं खरं कारण आलं समोर; पत्नी म्हणाली “फंक्शनमध्ये गेलो तेव्हा अचानक..”
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विकास सेठीचं रविवारी कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. विकासच्या निधनाचं खरं कारण त्याची पत्नी जान्हवी सेठने पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. ते दोघं नाशिकला एका कार्यक्रमाला गेले होते.
रविवारी टीव्ही इंडस्ट्रीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली. ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता विकास सेठीचं निधन झालं. हे वृत्त वाचून अनेकांना मोठा धक्का बसला होता. वयाच्या 48 व्या वर्षी विकासचं कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सहवेदना व्यक्त केल्या. विकासचं निधन झोपेतच झाल्याची माहिती समोर येत आहे.
विकासने ‘कहीं तो होगा’, ‘दो दिल बंधे एक डोरी से’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. त्याने करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. यामध्ये तो रॉबीच्या भूमिकेत होता. मात्र गेल्या बऱ्याच काळापासून तो टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोविडच्या आधीपासूनच त्याच्या हातात कोणतंच काम नव्हतं. त्याने मालिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्याला कोणत्या भूमिका मिळत नव्हत्या. हळूहळू विकास टीव्ही इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांपासूनही दूर होऊ लागला होता. त्याने सर्वांसोबतचा संपर्क तोडला होता. गेल्या काही काळापासून तो आर्थिक समस्यांसाचाही सामना करत होता.
View this post on Instagram
हाती काम नव्हतं आणि आर्थिक समस्यांमुळे विकास सतत तणावात होता. अशातच रविवारी झोपेत त्याला कार्डिअॅक अरेस्ट आला आणि विकासने आपले प्राण गमावले. विकासची पत्नी जान्हवी सेठने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की “आम्ही एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाशिकला गेलो होतो. कार्यक्रमादरम्यानच अचानक विकासची प्रकृती बिघडली. त्याला उल्ट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला होता. डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं आणि त्यानंतर तो झोपून गेला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास मी विकासला उठवायला गेले, तेव्हा त्याची प्राणज्योत मालवली होती.” विकासच्या पश्चात त्याची पत्नी आणि जुळी मुलं असा कुटुंब आहे.