Vikram Gokhale: विक्रम गोखले यांचे 5 दमदार चित्रपट; अविस्मरणीय ठरल्या त्यांच्या ‘या’ भूमिका
विक्रम गोखलेंनी दमदार अभिनयाने गाजवल्या 'या' भूमिका
मुंबई: भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांमध्ये विक्रम गोखले यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. चित्रपट, टेलिव्हिजन, रंगभूमी अशा तिन्ही व्यासपीठांवर त्यांनी दमदार कामगिरी केली. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. 1971 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी ‘परवाना’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या काही लक्षात राहणाऱ्या भूमिका आणि चित्रपट कोणते ते पाहुयात..
1- सलीम लंगडे पे मत रो (1989)- सईद अख्तर मिर्झा यांच्या या चित्रपटाला विक्रम गोखलेंनी अविस्मरणीय बनवलं. यामध्ये त्यांनी सलीमच्या वडिलांची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
2- हम दिल दे चुके सनम (1999)- सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा हा चित्रपट तर अनेकांनी पाहिलाच असेल. या चित्रपटात विक्रम गोखलेंनी ऐश्वर्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका कायम लक्षात राहील अशी आहे.
3- आघात (2010)- या चित्रपटात त्यांनी डॉक्टर खुरानाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द विक्रम गोखलेंनीच केलं होतं. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाचा चित्रपट होता. समिक्षकांकडून या चित्रपटाचं विशेष कौतुक झालं होतं.
4- अनुमती (2013)- या चित्रपटातील विक्रम गोखलेंच्या दमदार कामगिरीला नेहमीच कौतुक केलं जाईल. यामध्ये रिमा लागू, नीना कुळकर्णी आणि सुबोध भावे या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला होता. तर विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
5- भुल भुलैय्या (2007)- अक्षय कुमारच्या भुल भुलैय्या या गाजलेल्या चित्रपटात विक्रम गोखले यांनी श्री यज्ञप्रकाशजी भारती ही व्यक्तीरेखा साकारली होती. चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच छोटी होती. मात्र त्यातही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली होती.