विक्रांत मेस्सीचं अभिनयातून संन्यास? अखेर सांगितला त्या पोस्टचा खरा अर्थ
'बारवी फेल' या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता विक्रांत मेस्सी याने त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. तो अभिनयातून संन्यास घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.
टेलिव्हिजनकडून बॉलिवूडकडे यशस्वी प्रवास करणारा अभिनेता विक्रांत मेस्सीने सोमवारी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट वाचून सर्वांना धक्का बसला. या पोस्टद्वारे विक्रांतने अभिनयातून संन्यास घेत असल्याचा इशारा दिला होता. त्यावर चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आश्चर्य व्यक्त करत त्याला ‘का’ असा प्रश्न विचारला होता. आता खुद्दा विक्रांतने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलंय की तो एक मोठा ब्रेक घेणार आहे. मात्र याचा अर्थ अभिनयातून संन्यास घेणं नाही. गेल्या काही वर्षांपासून केलेल्या सततच्या कामामुळे शारीरिक, मानसिक तणाव येऊन ब्रेकची फार गरज असल्याचं त्याने म्हटलंय.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत म्हणाला, “मी निवृत्त होत नाहीये. मी खूप थकलोय. मला एका मोठ्या ब्रेकची खूप गरज आहे. मला घराची खूप आठवण येते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. लोकांनी माझ्या पोस्टचा वेगळाच अर्थ काढला.” विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘गेली काही वर्षे आणि त्यापुढील काळ अभूतपूर्व होता. मी जसजसा पुढे जातोय तसतसं मला जाणवतंय की आता घरी परतण्याची आणि मिळवलेल्या यशाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. एक पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि एक अभिनेता म्हणूनही. त्यामुळे पुढील योग्य वेळ येईपर्यंत 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटू.’ या पोस्टनंतर तो अभिनयातून संन्यास घेण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
View this post on Instagram
करिअरच्या शिखरावर असताना विक्रांतने अचानक इतका मोठा आणि धक्कादायक निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला. ‘ब्रेक्स खूप बेस्ट असतात. त्यानंतर तू आणखी चांगला होशील’, असं अभिनेत्री दिया मिर्झाने म्हटलं होतं. तर ‘द साबरमती रिपोर्ट’मधील सहकलाकार राशी खन्नाने आश्चर्य व्यक्त करत लिहिलं, ‘काय? नाही.’ ‘बारवी फेल’ या चित्रपटातील अभिनेत्री मेधा शंकरनेही प्रश्नचिन्ह पोस्ट करत ‘काय’ असा सवाल केला होता. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो, असा अंदाज वर्तवला होता.
या पोस्टनंतर सोमवारी सकाळी विक्रांतने त्याच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री, खासदार आणि चित्रपटाची टीम या स्क्रिनिंगला उपस्थित होती. यावेळी माध्यमांनी विक्रांतला त्याच्या पोस्टविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतीची प्रतिक्रिया देण्यास टाळलं होतं. 2023 मध्ये विक्रांतच्या करिअरमधील सर्वांत हिट ‘बारवी फेल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.