Virat Anushka | ‘वर्ल्ड कपची तिकिटं मागू नका’; विराट-अनुष्काच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष
वर्ल्ड कपचा सामना स्टेडियममध्ये बसून पाहण्याची असंख्य क्रिकेटप्रेमींची इच्छा असते. अशातच जर आपला जवळचा मित्र किंवा मैत्रीण त्या वर्ल्ड कपशी संबंधित असेल, तर मॅचच्या तिकिटांची विनंती आवर्जून केली जाते. अशाच विनंत्यांना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा वैतागले आहेत.
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : ODI वर्ल्ड कप 2023, येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. त्याआधी क्रिकेटर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहते आणि मित्रमैत्रिणींना खास विनंती केली आहे. त्याच्या या विनंतीवर पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची प्रतिक्रियासुद्धा समोर आली आहे. अनुष्का गेल्या काही दिवसांपासून तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा आई-बाबा बनणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्यावर अद्याप दोघांची कोणतीची प्रतिक्रिया समोर आली नाही.
विराट कोहलीने ओटीआय वर्ल्ड कप 2023 च्या एक दिवस आधी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित चाहते आणि मित्रांना खास विनंती केली आहे. वर्ल्ड कप मॅचचं तिकिट मिळवून देण्यासाठी कोणीच विचारू नका, अशी विनंती त्याने या पोस्टद्वारे केली आहे. त्याने लिहिलं, ‘वर्ल्ड कप जवळ येत असताना, मी माझ्या सर्व मित्रांना नम्रपणे ही विनंती करू इच्छितो की त्यांनी संपूर्ण टूर्नामेंटदरम्यान माझ्याकडे तिकिटांची विनंती करू नये. कृपया तुम्ही तुमच्या घरातूनच हा सामना एंजॉय करा.’ यासोबतच त्याने हसतानाचा इमोजी पोस्ट केला आहे.
विराटची ही पोस्ट शेअर करत अनुष्काने लिहिलं, ‘..आणि त्यात मलासुद्धा एक गोष्ट सांगायची आहे. जर तुमच्या मेसेजेसना उत्तर नाही मिळालं तर कृपया माझ्याकडे मदतीसाठी विनंती करू नका. तुमच्या समजूतदारपणासाठी धन्यवाद.’ असं लिहित अनुष्काने हात जोडल्याचे आणि हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अनुष्का आणि विराट यांच्या या पोस्टवरून हे सहज स्पष्ट होतंय की दोघांचे मित्रमैत्रिणी त्यांच्याकडे अनेकदा क्रिकेट मॅचेसच्या तिकिटांसाठी विनंती करत असतील. म्हणूनच यावेळी वैतागून विराटने थेट सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली आहे.
ICC ODI World Cup 2023 येत्या गुरुवार म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. हा वर्ल्ड कप 19 नोव्हेंबरपर्यंत भारतात खेळला जाईल. या संपूर्ण वर्ल्ड कपचं आयोजन भारत एकट्याने करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2023 च्या या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 14 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.