Sai Pallavi: “त्यानंतर मी पुन्हा कधीच प्रेमपत्र लिहिण्याचं धाडस केलं नाही”; साई पल्लवीने सांगितला किस्सा
'विराट पर्वम' हा चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, परंतु बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर 1 जुलै रोजी तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीचे (Sai Pallavi) जगभरात चाहते आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांना तिच्या चित्रपटांइतकाच साईच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस आहे. नुकच्याच दिलेल्या एका मुलाखतीत साईने खुलासा केला की, शाळेत एका मुलासाठी लिहिलेल्या प्रेमपत्राबद्दल जेव्हा तिच्या आई-वडिलांना समजलं, तेव्हा त्यांनी तिला चांगलाच मार दिला होता. साईचा ‘विराट पर्वम’ (Virata Parvam) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. यामध्ये तिने साकारलेली वेन्नेला ही व्यक्तिरेखा चित्रपटात असंच काहीसं करताना दिसते. चित्रपटातील तिची व्यक्तीरेखा आईच्या नकळत आपला जीव धोक्यात घालून राणा डग्गुबतीला एक प्रेमपत्र (love letter) देते. या कथेवरून तिने तिच्या लहानपणीचा किस्सा मुलाखतीत सांगितला.
पुन्हा प्रेमपत्र लिहिण्याचं धाडस केलं नाही
साईने चित्रपटात जरी प्रेमपत्र लिहिलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र तिने आई-वडिलांकडून मार खाल्ल्यानंतर पुन्हा कधीच प्रेमपत्र लिहिण्याचं धाडस केलं नाही. नेटफ्लिक्सच्या माय व्हिलेज या शोमध्ये चित्रपटाबद्दल बोलताना साईने तिच्या खऱ्या आयुष्यातील हा किस्सा सांगितला.
आईवडिलांकडून खावा लागला होता मार
चित्रपटात दाखवलेलं पत्र हे तिने खरंच लिहिलं होतं की ती अभिनय करत होती असा प्रश्न विचारला असता साई म्हणाली, “दिग्दर्शकांनी जसं सांगितलं त्यानुसारच मी अभिनय केला होता. पण खऱ्या आयुष्यात मी एकदाच पत्र लिहिलं होतं. सातवीत असताना मी एका मुलाला पत्र लिहिलं होतं. पण दुर्दैवाने मी पकडले गेले आणि त्यावेळी माझ्या आई-वडिलांनी मला खूप मारलं.”
View this post on Instagram
जेव्हा हाच प्रश्न अभिनेता राणा डग्गुबातीला विचारण्यात आला. तेव्हा त्याने उत्तर दिलं की त्याने त्याचे दिवंगत आजोबा आणि चित्रपट निर्माते डग्गुबती रामनायडू यांना पत्र लिहिलं होतं. “मी लहानपणी करमचेडूमध्ये माझ्या आजोबांना एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मी कोणालाही पत्र लिहिलं नाही,” असं तो म्हणाला.
‘विराट पर्वम’ हा चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, परंतु बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर 1 जुलै रोजी तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला. या तेलुगू रोमँटिक ॲक्शन ड्रामाची निर्मिती वेणू उदुगुला यांनी केली आहे. हा चित्रपटाची कथा 1990 च्या दशकातील नक्षलवादी चळवळीच्या काळात तेलंगणामध्ये बेतलेली आहे. यात प्रियामणी, नंदिता दास, नवीन चंद्र, जरीना वहाब, ईश्वरी राव आणि साई चंद यांच्याही भूमिका आहेत.