मुंबई: ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मुंबईत कोट्यवधींचं घर खरेदी केलं, अशी चर्चा होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याशेजारी त्यांनी हे घर घेतल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर या फ्लॅटची किंमत तब्बल 18 कोटी रुपये आहे, अशाही चर्चांना उधाण आलं होतं. आता या सर्व चर्चांवर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चांबद्दल ट्विट करत अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा काँग्रेस, आप आणि बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांमध्ये याचा समावेश होतो. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई झाल्यानंतर अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी मिळून फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली.
I am really grateful to all the Congressis, AAPiyas and unemployed Bollywoodiyas for building new apartments for me everyday and also for furnishing them with luxury furniture. I really liked the sofa which came from 10 Janpath.
Thank you everyone. Thank you @ikaveri ji. pic.twitter.com/F15h9EysA5
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) December 3, 2022
या सर्व चर्चांवर ट्विट करत अग्निहोत्रींनी लिहिलं, ‘मी काँग्रेसी, आप आणि बेरोजगार बॉलिवूडकरांचा आभारी आहे, जे माझ्यासाठी दररोज नवीन अपार्टमेंट बनवत आहेत. इतकंच नव्हे तर त्या घरात आलिशान फर्निचरदेखील बसवत आहेत. 10 जनपथवरून आणलेला सोफा मला खूपच आवडला. सर्वांचे खूप आभार.’
विवेक अग्निहोत्री यांनी हे नवीन घर वर्सोवा परिसरातील पार्थेनॉन टॉवर्समध्ये विकत घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. इमारतीतील 30 व्या मजल्यावर त्यांनी हे घर घेतलं आणि सप्टेंबर 2022 मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन पार पडलं, असंही म्हटलं गेलं होतं. 1200 चौरस फूटांवर पसरलेल्या या फ्लॅटसाठी विवेक यांनी जवळपास एक कोटी रुपये रजिस्ट्रेशनसाठी दिले, अशी चर्चा होती.