‘आत्महत्येचा विचार केला’; विवेक ओबेरॉयने केला धक्कादायक खुलासा
'सुशांतच्या वेदनांना मी समजू शकतो'; जेव्हा विवेक ओबेरॉयनेही सर्वकाही संपवण्याचा केला होता विचार
मुंबई: अभिनेता विवेक ओबेरॉयने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. मात्र काही काळानंतर तो इंडस्ट्रीतून गायब झाला. विवेक ओबेरॉयला अपेक्षित यश मिळालं नाही. ‘साथियाँ’ सारख्या चित्रपटानंतर करिअर उत्तम सुरू असताना काही वादांमुळे तो चर्चेत आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने त्या काळाचा उल्लेख केला. इतकंच नव्हे तर एकेदिवशी सर्व काही संपवण्याचा निर्णय घेतला होता, असा धक्कादायक खुलासाही त्याने केला.
“माझ्याकडे दीड वर्षे कुठलंच काम नव्हतं. मी चित्रपटांचे ऑडिशन द्यायला जायचो. मात्र सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे असं कोणालाच सांगत नव्हतो. त्यावेळी मनात अनेकदा वाईट विचार यायचे. एकेदिवशी मी सर्वकाही संपवण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता”, असं विवेक म्हणाला.
“मी माझ्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे खूप त्रस्त झालो होतो. कदाचित हाच अजेंडा होता. हा अजेंडा कधी-कधी तुमचं मानसिक खच्चीकरण करतो. सर्वकाही संपवण्याचा अर्थ खूप खोल आहे. मी त्या वेदनांना समजू शकतो, ज्या वेदनेतून सुशांत सिंह राजपूत आणि इतर गेले असतील. माझ्या पत्नीने माझी खूप साथ दिली”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
करिअरमधल्या त्या कठीण काळाबद्दल विवेक पुढे म्हणाला, “खोटं जेव्हा सतत आणि रेटून बोललं जातं, तेव्हा तुम्हाला ते खरं वाटू लागतं. तुम्ही त्यावर विश्वास ठेवू लागता. मात्र फार काळ सत्याला लपवता येत नाही. माझ्या आईनेही त्या नकारात्मक भावनेतून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली.”
विवेकचा ‘धारावी बँक’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. यामध्ये त्याने सुनील शेट्टीसोबत भूमिका साकारली. बॉलिवूडसोबतच विवेकने ओटीट प्लॅटफॉर्मवरही काम केलंय.