Adipurush | ‘हनुमानजी बहिरे होते का?’; ओम राऊत यांच्या ट्विटवरून भडकले नेटकरी
ओम राऊत यांचं हे जुनं ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटकरी बरीच टीका करत आहेत. 'या गोष्टीचा सूट आदिपुरुषसारखा चित्रपट बनवून घेणार का', असा उपरोधिक सवाल एका युजरने केला.
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर नेटकऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसून येत आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप काही जण करत आहेत. इतकंच नव्हे तर त्यातील डायलॉग्सचीही खिल्ली उडवली जात आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून नवा वाद सुरू झाला असतानाच आता दिग्दर्शक ओम राऊत यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी हे ट्विट केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केलं आहे. तोपर्यंत ओम राऊत यांच्या वादग्रस्त ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांचं हे ट्विट 4 एप्रिल 2015 मधील आहे. यादिवशी हनुमान जयंती होती.
हनुमान जयंतीनिमित्त वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरून त्यांनी हे ट्विट केलं होतं, त्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘हनुमानजी बहिरे आहेत का? माझ्या इमारतीतील लोकांना कदाचित हेच वाटतंय. हनुमान जयंतीनिमित्त हे लोकं मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवत आहेत. इतकंच नव्हे तर जयंतीशी या गाण्याचा काहीच संबंध नाही.’ ओम राऊत यांचं हे जुनं ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटकरी बरीच टीका करत आहेत. ‘या गोष्टीचा सूट आदिपुरुषसारखा चित्रपट बनवून घेणार का’, असा उपरोधिक सवाल एका युजरने केला. तर अनेकांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत ओम राऊत यांच्यावर राग व्यक्त केला आहे.
पहा ट्विट-
Om Raut just deleted this old tweet after it went viral some few minutes ago! pic.twitter.com/t68G5Jci1p
— Rohit (@Rohit___pawar) June 17, 2023
एकीकडे ओम राऊत यांचं हनुमानाविषयीचं हे ट्विट व्हायरल होत असून दुसरीकडे ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाच्या तोंडी असलेल्या डायलॉगची खिल्ली उडवली जातेय. “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरी बाप की”, असा हा डायलॉग आहे. हा संवाद लिहिताना काही चूक झाली का, असं विचारलं असता मनोज मुंतशीर म्हणाले, “ही चूक नाही. अत्यंत सूक्ष्म विचारप्रक्रियेतनंतरच बजरंग बली आणि सर्व पात्रांसाठी डायलॉग लिहिण्यात आले आहेत. आम्ही जाणूनबुजून ते डायलॉग सोप्या भाषेत लिहिले आहेत. कारण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की जर चित्रपटात अनेक पात्रं असतील तर प्रत्येकाची भाषा एकाच प्रकारची असू शकत नाही. प्रत्येक पात्राच्या भाषेत विविधता आणावी लागते.”