Samantha: समंथाला झालेला ‘मायोसिटिस’ आजार म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं अन् उपाय..
समंथा 'मायोसिटिस'ने ग्रस्त; काय आहे हा नेमका आजार?
मुंबई- अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने रविवारी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला. समंथाने रुग्णालयातील तिचा पाठमोरा फोटो पोस्ट करत तिला झालेल्या आजाराची माहिती या पोस्टमधून दिली होती. ‘मायोसिटिस’ या दुर्मिळ आजाराने समंथाला ग्रासलं आहे. या ऑटोइम्युन हेल्थ कंडिशनवर मात करण्यासाठी समंथा सध्या परदेशी उपचार घेत आहे. या पोस्टवर अनेकांनी समंथाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. तर अनेकांना हा आजार नेमका काय आहे, असा प्रश्नही पडला. मायोसिटिस या आजाराविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात..
मायोसिटिस म्हणजे काय?
मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये जळजळ होते. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ. याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.
मारेंगो क्यूआरजी रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. संतोष कुमार म्हणाले, “मायोसिटिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे रुग्णाच्या स्नायूंवर त्याच्याच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो.”
“यात सहसा हात, खांदे, पाय, पार्श्वभाग, पोट आणि पाठीच्या स्नायूंवर परिणाम होतो. आजार आणखी बळावला असेल तर त्याचा अन्ननलिका, डायफ्राम आणि डोळ्यांच्या स्नायूंवरदेखील परिणाम होऊ शकतो. अशा रुग्णांना बसल्यानंतर उभं राहताना, पायऱ्या चढताना, वस्तू उचलतानाही सहत्रा त्रास होतो”, असं ते पुढे म्हणाले.
मायोसिटिसची लक्षणं कोणती?
“मायोसिटिसमध्ये सर्वसामान्यपणे स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवतात. स्नायूंचं दुखणं आणि दैनंदिन जीवनातील कामं करण्यात अडचण अशी लक्षणं असतात. हलका ताप, पुरळ आणि सांधेदुखी ही सुद्धा सामान्य लक्षणं असू शकतात”, अशी माहिती डॉ. मेनन यांनी दिली.
डॉ. अग्रवाल यांच्या मते या आजाराच्या इतर लक्षणांमध्ये ताप, वजन कमी होणं, सांधेदुखी, थकवा आणि स्नायू दुखणं यांचाही समावेश होतो.
निदान आणि उपचार काय?
“या आजाराचं निदान सामान्यपणे क्लिनिकल तपासणी, रक्ताचं कार्य, एमआर इमेजिंग, ईएमजी आणि मसल बायोप्सीनंतर केलं जातं. त्यावर स्टेरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसिव्ह औषधांनी उपचार केले जातात”, असं डॉ. अग्रवाल म्हणतात.
डॉ. मेनन यावर म्हणतात, “जर या आजाराचं कारण व्हायरल इन्फेक्शन असेल तर ते स्वत:च्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतं. जर औषधांमुळे झालं असेल तर औषध बंद केल्यावर ते बरं होऊ शकतं. पण याचं सर्वसामान्य कारण हे स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती असते. शरीरातील अँटिबॉडीज जे स्नायूंच्या पेशींना लक्ष्य करतात आणि त्यामुळे जळजळ म्हणजेच वेदना, अशक्तपणा जाणवू लागतो.”
View this post on Instagram
“व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेल्या मायोसिटिसचं निदान रक्त चाचण्यांद्वारे केलं जातं. कधी कधी EMG द्वारेही त्याचं निदान केलं जाऊ शकतं. या ऑटोइम्यून आजाराला विशेषत: स्टेरॉइड आणि इम्युनोसप्रेसंट्सची आवश्यकता असते. हा आजार आयुष्यभर असू शकतो, त्यामुळे त्यावरील उपचारही परिस्थितीनुसार अनिश्चित असू शकतात”, अशी माहिती डॉ. सुधा मेनन यांनी दिली.
काय होती समंथाची पोस्ट-
‘तुमच्याकडून मिळणारं प्रेम आणि साथ यांमुळेच मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या खडतर आव्हानांना सामोरं जाण्याची शक्ती मिळतेय. काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या आजाराचं निदान झालं. आजारातून बरी झाल्यानंतर मी तुम्हाला याविषयीची माहिती देणार होते. मात्र बरं होण्यास मला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागतोय. हळूहळू मला ही गोष्ट समजतेय की प्रत्येक वेळी आपण मजबूतच राहिलं पाहिजे असं काही नाही. ही अगतिकता स्वीकारणं एक गोष्ट आहे आणि त्याला अजूनही मी सामोरी जातेय. मी लवकरच पूर्ण बरी होईन असा डॉक्टरांना विश्वास आहे. माझ्या आयुष्यात मी चांगले दिवस पाहिले.. वाईटही पाहिले.. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या. यातील आणखी एक दिवस मी आता हाताळू शकत नाही, असं वाटत असतानाच तो क्षण कसा तरी निघून जातो. मी लवकरच बरी होईन असा मला विश्वास आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल’, अशी पोस्ट समंथाने लिहिली होती.