फिल्म इंडस्ट्रीबद्दल ऐश्वर्याचं पहिल्यांदाच रोखठोक मत; म्हणाली..
बॉलिवूड इंडस्ट्रीचा 'हा' पैलू ऐश्वर्या रायने आणला समोर
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सहसा मुलाखतींमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल रोखठोक बोलताना दिसत नाही. फिल्म इंडस्ट्रीबद्दल ऐश्वर्याने नेहमीच मोजून-मापून वक्तव्यं केली आहेत. मात्र एका मुलाखतीत ती पहिल्यांदाच बॉलिवूड इंडस्ट्रीतील (Bollywood Industry) लोकांच्या मानसिकतेबद्दल मोकळेपणे बोलताना दिसली. ऐश्वर्या जवळपास 25 वर्षांहून अधिक काळ या इंडस्ट्रीत काम करतेय. त्यामुळे त्याची प्रत्येक बाजू तिला माहीत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोक खेकड्याच्या मानसिकतेची आहेत, असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
सिमी गरेवालला दिलेल्या या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, “हे फक्त या इंडस्ट्रीपुरतंच मर्यादित आहे की नाही हे मला माहीत नाही. पण जेव्हा मी खेकड्याची मानसिकता असं म्हणते, तेव्हा ते सर्वसामान्य प्रत्येक क्षेत्राबाबत आहे. एका टोपलीत सर्व खेकडे ठेवले असताना, त्यातील एक खेकडा वर येण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी इतर खेकडे त्याला खाली खेचतात.”
View this post on Instagram
इंडस्ट्रीतील लोकांची ही मानसिकता अतिशय वाईट असल्याचं तिने म्हटलं होतं. “सुदैवाने मला त्या गोष्टीचा फटका बसला नाही. कारण मी इतरांसारखी सर्वसामान्य नवोदित कलाकार नव्हते. माझ्या पहिल्या चित्रपटावरून माझं इथलं भविष्य ठरवलं गेलं नव्हतं. त्यामुळे त्यादृष्टीने मी सुरक्षित होते. एखादा चित्रपट फ्लॉप झाला तर मला असुरक्षित वाटत नव्हतं”, असंही ती म्हणाली.
ऐश्वर्याने 1997 मध्ये ‘इरुवर’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यापूर्वीही तिच्याकडे चित्रपटांचे बरेच ऑफर्स होते. मात्र तिने ते ऑफर्स नाकारले होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं.