Dharmedra | “ती 5 वर्षे.. आयुष्यातील सर्वांत कठीण काळ”; असं का म्हणाले होते धर्मेंद्र?
बऱ्याच वर्षांपूर्वी ज्याप्रकारे धर्मेंद्र यांनी राजकारणातून काढता पाय घेतला होता. तसंच काहीसं आता सनी देओलसोबत घडताना दिसतंय. सनी देओलच्या मतदारसंघात त्याच्या विरोधात फार नाराजी आहे. अनेकदा तो बेपत्ता असल्याचे उपरोधिक पोस्टर्स तिथे लावले गेले आहेत.
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. वयाच्या 65 व्या वर्षीही सनी देओलचं फिल्मी करिअर चकाचक आहे. मात्र राजकारणाच्या बाबतीत त्याचा रिपोर्ट काही खास नाही. गुरदासपूरमधील लोक तर त्याच्यावर खूप नाराज आहेत. त्यातच आता खुद्द सनी देओलने निवडणूक लढवण्यास साफ नकार दिला आहे. 2019 मध्ये निवडणुकांच्या आधी सनी देओलने राजकारणात एण्ट्री केली होती. भारतीय जनता पार्टीने त्याला तिकिट दिलं आणि गुरदासपूर इथून तो निवडून देखील आला. हा तोच काळ होता, तेव्हा सनी देओलचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालत नव्हते.
सनी देओलच्या बॉलिवूडमधील करिअरला उतरती कळा आली होती आणि राजकारणात एण्ट्री करताच त्याचा प्रवास यशाच्या दिशेने सुरू झाला. मात्र आता 2024 च्या निवडणुकीआधीच सनी देओलने निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. सध्या तो ‘गदर 2’ या चित्रपटाच्या यशामुळे देशभरात गाजतोय. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे हा चित्रपट चांगली कामगिरी करत असताना सनी देओलने राजकारणापासून लांब राहण्याचं ठरवलं आहे. “मी एक अभिनेता म्हणून देशाची सेवा करेन. मात्र राजकारण मला जमणार नाही”, असं त्याने स्पष्ट केलं. फक्त सनी देओलच नाही तर त्याच्या आधी वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचासुद्धा राजकारणातून असाच मोहभंग झाला होता.
धर्मेंद्र यांनी बरीच वर्षे बॉलिवूडवर राज्य केलं. वयाच्या 87 व्या वर्षीही ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. मात्र राजकारणातील त्यांचा प्रवास फारसा चांगला नव्हता. धर्मेंद्र यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “मी कधीच विचार केला नव्हता की मी राजकारणात प्रवेश करेन. राजकारणात चांगली लोकं नसतात, असंच मी म्हणायचो. त्यावर माझे मित्र मला म्हणायचे की जर चांगली लोकं राजकारणात आलीच नाहीत, तर राजकारण चांगलं कसं असेल? त्यामुळे मला वाटलं की, मी राजकारणात प्रवेश करून देशात बदल घडवून आणेन. मात्र ती पाच वर्षे, माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता. त्या पाच वर्षांत मी बीकानेरसाठी जे काही केलं, ते फक्त मलाच माहीत आहे. तरीसुद्धा मला कामाचं श्रेय मिळालं नाही. काम मी करायचो आणि लोक आपल्या नावाने दगड लावून जायचे. तो काळ फार कठीण होता. ज्यादिवशी मी राजकारणात प्रवेश करण्यासाठी होकार दिला, त्यादिवशी मी जणू आरशावर स्वत:चं डोकं मारून घेतलं होतं.”
बऱ्याच वर्षांपूर्वी ज्याप्रकारे धर्मेंद्र यांनी राजकारणातून काढता पाय घेतला होता. तसंच काहीसं आता सनी देओलसोबत घडताना दिसतंय. सनी देओलच्या मतदारसंघात त्याच्या विरोधात फार नाराजी आहे. अनेकदा तो बेपत्ता असल्याचे उपरोधिक पोस्टर्स तिथे लावले गेले आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या ‘गदर 2’ या चित्रपटालाही तिथे विरोध केला गेला. सनी देओलचा मतदारसंघ असूनही तो तिथल्या लोकांची भेट घेत नाही, त्यांच्या समस्या जाणून घेत नाही, विकासासाठी काही करत नाही, असा आरोप गुरदारपूरमधल्या नागरिकांनी केला.