मुंबई : सासू-सुनेत कुरबूर होण्याची घटना काही नवीन नाही. मग ते सर्वसामान्यांच्या घरी असो किंवा मग सेलिब्रिटींच्या. अनेकदा सासू-सुनेच्या नात्यात शीतयुद्ध सुरू असल्याचं आपण पाहिलंय. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन एका मुलाखतीत सून ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. 2010 मध्ये दिलेल्या या मुलाखतीत जया म्हणाल्या की जर त्यांना ऐश्वर्याबद्दल एखादी गोष्ट आवडत नसेल, तर ती गोष्ट तिच्या तोंडावर सांगायच्या. पाठीमागे राजकारण करायला आवडत नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक हा ‘धूम 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला. 14 जानेवारी 2007 रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडला आणि त्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या-अभिषेकने लग्नगाठ बांधली. मुंबईतील प्रतीक्षा बंगल्यावर हा लग्नसोहळा पार पडला. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला.
रेडिफला दिलेल्या मुलाखतीत जया म्हणाल्या, “ती माझ्या मैत्रिणीसारखी आहे. जर मला तिची एखादी गोष्ट आवडली नाही तर ते मी तिच्या तोंडावर सांगते. तिच्या पाठीमागे मी राजकारण करत नाही. जर तिला माझी गोष्ट मान्य नसेल, तर तीसुद्धा मोकळेपणे व्यक्त होते. यात फक्त इतकाच फरक आहे की मी थोडी जास्त नाटकी वागू शकते आणि तिला थोडं अधिक आदराने वागावं लागतं, कारण मी वयाने मोठी आहे.”
“आम्हाला घरी बसून वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला आवडतं. फक्त आम्ही दोघीच असलं पाहिजे. तिला फार वेळ नसतो, मात्र त्यातही आम्ही जो वेळ घालवतो, तो आम्हाला आवडतो. माझं तिच्यासोबत खूप चांगलं नातं आहे”, असं त्यांनी सांगितलं होतं.
त्यानंतर 2015 मध्ये ‘डिएनए’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक त्याची आई आणि पत्नीमधील नात्याविषयी व्यक्त झाला होता. “माँ आणि अॅश माझ्याविरोधात एकत्र येतात आणि त्या दोघी बंगाली भाषेत काहीतरी बडबडू लागतात. आई बंगाली असल्याने तिला ती भाषा येते आणि ऐश्वर्याने चोखेर बाली या चित्रपटात रितू दा (रितुपर्णो घोष) यांच्यासोबत काम केलं होतं, त्यामुळे तिलाही ती भाषा कळते, बोलता येते. त्यामुळे जेव्हा कधी त्या दोघींना माझ्याविरोधात बोलायचं असतं, तेव्हा त्या बंगाली भाषेत बोलू लागतात”, असं अभिषेक म्हणाला होता.