Pooja Bhatt | खान कुटुंबातील ‘या’ व्यक्तीसोबत पूजा भट्टला करायचं होतं लग्न; सगळं काही ठरलं होतं पण..
एका मुलाखतीत पूजाने सलमानशी फारसं पटत नसल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी पूजा ही सलमानचा भाऊ सोहैल खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
मुंबई : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या एपिसोडपासून हा सिझन चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करतोय. बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये अभिनेत्री पूजा भट्टचाही समावेश आहे. विशेष म्हणजे एका मुलाखतीत पूजाने सलमानशी फारसं पटत नसल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी पूजा ही सलमानचा भाऊ सोहैल खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. पूजा भट्टने 2003 मध्ये मनिष मखिजाशी लग्न केलं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर पूजाने पतीला घटस्फोट दिला. 2014 मध्ये पूजा आणि मनिष विभक्त झाले. तर दुसरीकडे सोहैल खानने 1998 मध्ये सीमा खानशी लग्न केलं. गेल्याच वर्षी या दोघांचाही घटस्फोट झाला.
सलमान खानबद्दल काय म्हणाली पूजा?
1995 मध्ये पूजाने ‘स्टारडस्ट मॅगझिन’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने सलमानसोबतच्या नात्याविषयी वक्तव्य केलं होतं. “मी हे मान्य करते की सलमान आणि मी सुरुवातीला काही विचित्र कारणांमुळे एकमेकांचा तिरस्कार केला. आमचं एकमेकांशी पटायचंच नाही. त्यामुळेच आमच्यात बरेच वाद झाले होते. कदाचित मी ‘लव्ह’ हा चित्रपट न केल्यामुळे या वादाला सुरुवात झाली होती. पण आज आम्ही एकमेकांशी चांगले बोलतो. किंबहुना आम्ही एक मोठं सुखी कुटुंब आहोत”, असं ती म्हणाली होती.
सोहैल खानच्या प्रेमात होती पूजा भट्ट
यात मुलाखतीत पूजाने सलमानचा भाऊ सोहैल खानसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. ती पुढे म्हणाली, “मी नक्कीच लग्नाचा विचार करतेय पण सोहैल एक दिग्दर्शक म्हणून एका रोमांचक आणि नवीन करिअरच्या उंबरठ्यावर आहे. मलासुद्धा लग्नाचं स्थळ आणि मेनू ठरवण्याआधी दोन वर्षे काम करायचं आहे. आम्हा दोघंसुद्धा एकमेकांसोबत भविष्य पाहतोय. कोणत्याही सर्वसामान्य नात्याप्रमाणे नाही तर दोघांच्या मनात एकत्र राहण्याची खूप इच्छा आहे. ते मलाही हवं आहे आणि त्यालाही.”
आर. बाल्की दिग्दर्शित ‘चुप : रेव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती. पूजाने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे बेगम्स’ या सीरिजमधून अभिनयात पुनरागमन केलं. या सीरिजमध्ये तिच्यासोबत शहाना गोस्वामी, प्लाबिता बोरठाकूर आणि अमृता सुभाष यांच्याही भूमिका होत्या.