मुंबई : 2 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 1 फेब्रुवारी रोजी पूनमचं सर्वाइकल कॅन्सरने निधन झालं. तिच्या टीमकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पूनम विविध कॉन्ट्रोव्हर्सीमुळे सतत चर्चेत होती. पूनम पांडे आणि कॉन्ट्रोव्हर्सी हे जणू समीकरणच बनलं होतं. मात्र तिला विविध कॉन्ट्रोव्हर्सी का करावे लागले, याचा खुलासा खुद्द तिनेच एका मुलाखतीत केला होता. 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पूनम याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली कोणीतरी दखल घ्यावी, आपली चर्चा व्हावी यासाठी कॉन्ट्रोव्हर्सी केल्याचं तिने कबूल केलं होतं.
IANS या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पूनम म्हणाली होती, “इंडस्ट्रीत बऱ्याच मुलींनी खान आणि कपूर सेलिब्रिटींसोबत काम केलंय. मात्र त्यांना कोणीच ओळखत नाही. कारण लोक फक्त खान आणि कपूर कुटुंबीयांनाच ओळखतात. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं खूप कठीण असतं. खासकरून तेव्हा अधिक कठिण असतं जेव्हा तुमचा कोणीच गॉडफादर नसतो किंवा तुम्हाला तुमचं कुटुंब इंडस्ट्रीतील नसतं. त्यामुळे ती ओळख आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कॉन्ट्रोव्हर्सीची मदत होऊ शकेल असं मला वाटलं.”
पती सॅम बॉम्बेवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्यामुळे पूनम चर्चेत आली होती. तिचं नाव एका पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणातही आलं होतं, ज्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचाही समावेश होता. पूनमने राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांवर फसवणूक, चोरी आणि तिचे फोन नंबर लीक केल्याचा आरोप केला होता. कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये तिच्यावर झालेल्या आरोपांची कबुली देत पूनमने तिची चूक सुधारणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पूनम म्हणाली होती, “मला काम मिळत नव्हतं म्हणून मी कॉन्ट्रोव्हर्सी केली. मला कामाची खूप गरज होती. काही गोष्टींवर मी डोळे मिटून विश्वास केला. कोणीही मला म्हटलं की एखादी गोष्ट कर किंवा ते केल्याने तुझ्या करिअरला फायदा होईल, तर ते मी आंधणेपणानं करायचे. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे ते निर्णय चुकीचे होते.”