हृतिक-सुझानइतकाच महागडा घटस्फोट? नाग चैतन्यकडून 250 कोटींची पोटगी घेतल्याच्या चर्चांवर समंथा म्हणाली..
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य हे लग्नाच्या चार वर्षांनंतर विभक्त झाले. ही जोडी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाचीही खूप चर्चा झाली. या घटस्फोटानंतर समंथाला 250 कोटी रुपये पोटगी दिल्याची चर्चा होती.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 2017 मध्ये या दोघांनी गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं होतं आणि त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर समंथावर बरेच आरोप झाले होते. तिच्याचमुळे हे नातं तुटल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला होता. इतकंच नव्हे तर घटस्फोटानंतर मिळणाऱ्या पोटगीवरूनही समंथावर अनेकांनी निशाणा साधला होता. नाग चैतन्यकडून तिने 200 कोटी रुपये पोटगी मागितल्याची चर्चा होती. या चर्चांवर खुद्द समंथाने प्रतिक्रिया दिली होती.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये तिने हजेरी लावली होती. तेव्हा तिला पोटगीबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना समंथा उपरोधिकपणे म्हणाली, “होय, मी पोटगी म्हणून 250 रुपये घेतले आहेत. त्यामुळे मी रोज सकाळी माझ्या घराबाहेर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करते. इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना तरी मी सत्य दाखवू शकेन.”
View this post on Instagram
समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं गेलं. या दोघांनी नात्याविषयी कधी मोकळेपणे प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र अनेकदा त्यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. 8 ऑगस्ट रोजी सोभिता आणि नाग चैतन्यने साखरपुडा केला. या साखरपुड्याचे फोटो नाग चैतन्यचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
मुलाच्या साखरपुड्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत नागार्जुन म्हणाले, “साखरपुड्याचा कार्यक्रम खूप चांगल्याप्रकारे पार पडला. नाग चैतन्यला पुन्हा त्याचा आनंद मिळाला. तो खूप खुश आहे आणि त्याला पाहून मीसुद्धा खुश आहे. त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी मागचा काही काळ ठीक नव्हता. समंथासोबत विभक्त झाल्यानंतर तो खूप निराश झाला होता. माझा मुलगा दाखवत नाही, पण मला माहीत होतं की तो नाखुश आहे. सोभिता आणि त्याची जोडी चांगली आहे. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. साखरपुड्याला फक्त सोभिताचे आईवडील आणि बहीण, नाग चैतन्यची आई, माझी पत्नी अमला आणि मी उपस्थित होतो.”