‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यानंतर अभिनेत्री सुष्मिता सेनने महेश भट्ट दिग्दर्शित ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने स्वत:चाची भूमिका साकारली होती. ‘मिस युनिव्हर्स’ जिंकणारी सुष्मिता एका सायकोटिक स्टॉकरच्या निशाण्यावर कशी येते, याची कथा त्यात दाखवली आहे. या चित्रपटाची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिली होती. चित्रपटाच्या निमित्ताने ते अनेकदा सेटवर यायचे आणि सुष्मिताची भेट घ्यायचे. याच चित्रपटाच्या प्रॉडक्शनदरम्यान सुष्मिता आणि विक्रम भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी विक्रम भट्ट हे बालमैत्रीण अदितीशी विवाहित होते. त्यांना कृष्णा ही मुलगीसुद्धा आहे.
एका मुलाखतीत महेश भट्ट यांनीच ‘दस्तक’च्या शूटिंगदरम्यान सुष्मिता आणि विक्रम यांची प्रेमकहाणी कशापद्धतीने सेशेल्स याठिकाणी खुलत गेली, याविषयीचा खुलासा केला होता. ‘ई टाइम्स’शी बोलताना ते म्हणाले होते, “दस्तकच्या निर्मितीदरम्यान विक्रम आणि सुष्मिता यांच्यात सेशेल्समध्ये रोमान्स सुरू झाला होता. विक्रम माझा ‘राइट हँड’ होता आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने बरीचशी कामं केली होती. सुष्मितासोबत तो मनापासून संवाद साधायचा आणि तिथूनच त्यांच्या रोमान्सची सुरुवात झाली.”
आश्चर्याची बाब म्हणजे सुष्मिता आणि विक्रम यांचं सुरुवातीला एकमेकांशी पटत नव्हतं. सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला होता. विक्रम सतत माझ्याविषयी महेश सरांकडे तक्रार करायचा, असं तिने सांगितलं होतं. विक्रम यांनीही त्याला होकार दिला होता. सुष्मिता ऐनवेळी तिचे डायलॉग्स बदलायची आणि तिला खूप अहंकार आहे, अशी विक्रम यांची तक्रार होती. सुरुवातीच्या दिवसातील वादाबद्दल सांगताना सुष्मिता म्हणाली, “चित्रपटाचं शूटिंग संपत आलं होतं आणि त्याचवेळी माझ्या बोटाला मार लागला होता. तरीसुद्धा तो माझ्यावर ओरडत होता. त्याचे माझ्याशी वैयक्तिक वाद आहेत, असं मला वाटत होतं. कारण तो सतत महेश सरांकडे माझी तक्रार करायचा. पण हळूहळू जेव्हा आम्ही एकमेकांशी बोलू लागलो, तेव्हा आमच्यात चांगली मैत्री झाली होती. हळूहळू आमच्यातील केमिस्ट्री आम्हाला जाणवू लागली होती आणि अखेर त्याचं रुपांतर अफेअरमध्ये झालं.”
सुष्मितासोबत अफेअर असताना तू विवाहित होता का असा प्रश्न विचारला असता विक्रम यांनी सांगितलं, “आम्ही जेव्हा एकमेकांना डेट करू लागलो, तेव्हा मी विवाहित नव्हतो. पण जेव्हा आम्ही एकमेकांसोबत काम करताना मी विवाहित होतो. आमच्यात काही केमिस्ट्री सुरू होण्याआधीच माझं लग्न झालं होतं.” त्यावर सुष्मिता म्हणते, “तो आणि त्याची पत्नी एकमेकांसोबत खुश नव्हते. मी एखाद्या पुरुषाची निंदा करू शकत नाही किंवा त्याचं वैवाहिक आयुष्य वाईट सुरू असेल तर त्याला दोषी ठरवू शकत नाही. माझा त्याच्या पूर्व पत्नी किंवा मुलीविरोधात काहीच राग किंवा द्वेष नाही. पण काही गोष्टी एकमेकांसाठी बनलेल्याच नसतात. मला यात अपराधीपणा वाटत नाही कारण मी हे उघडपणे केलंय. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. त्याचा घटस्फोट निश्चित झाला नाही या फक्त कारणामुळे मी त्याच्यावर प्रेम करते हे जगाला सांगण्यासाठी मी प्रतीक्षा करायला तयार नव्हते.”
सुष्मिता आणि विक्रम यांचं नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी ब्रेकअप केला. नंतर विक्रमने याचा खुलासा केला की 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘अनकही’ या चित्रपटाची कथा थोडीफार सुष्मितासोबतच्या नात्याबद्दल होती.