तो सध्या काय करतो? KBC च्या पहिल्याच विजेत्याचं 22 वर्षांत असं बदललं नशिब
केबीसीचा पहिला विजेता हर्षवर्धन नवाथे आता कुठे आहे?
मुंबई- ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या रिॲलिटी शोने अनेक सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण केले. ज्ञानाच्या जोरावर स्पर्धकांना रोख रक्कम जिंकण्याची संधी या शोने दिली. या शोमुळे रातोरात अनेकांचं नशीब पालटलं. 2000 मध्ये केबीसीचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिझनमध्ये एक कोटी रुपये जिंकणारे पहिले स्पर्धक हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) ठरले होते. या घटनेला तब्बल 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता हर्षवर्धन कुठे आहेत, काय करत आहेत, केबीसीनंतर (KBC) त्यांच्या आयुष्यात कोणते बदल झाले हे फार क्वचितच लोकांना माहीत असेल.
हर्षवर्धन नवाथे यांचे वडील आयपीएस अधिकारी होते आणि ते स्वत: केबीसीमध्ये येण्याआधी सिव्हिल सर्व्हीससाठी तयारी करत होते. त्यावेळी ते मुंबईत राहत होते. आज त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हर्षवर्धन यांची पत्नी मराठी टीव्ही अभिनेत्री आहे.
View this post on Instagram
केबीसी जिंकल्यानंतर मिळालेल्या रकमेतून काय केलं, हे सांगताना ते ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मला मिळालेल्या पैशांतून मी चांगली गुंतवणूक केली. माझ्या पुढील अभ्यासावर काही पैसा खर्च केला. अभ्यासासाठी मी परदेशीही गेलो. मला मॉडेलिंग आणि अभिनयाचेही ऑफर्स मिळाले. त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं.”
हर्षवर्धन यांना आयएएस अधिकारी बनायचं होतं. मात्र ते स्वप्न अधुरंच राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आयुष्य तुमच्याकडून काही गोष्टी हिरावून घेते आणि त्याबदल्यात काही गोष्टी देतेसुद्धा. केबीसीचा अनुभव माझ्यासाठी असाच होता. त्या शोनंतर मला पैसा, प्रसिद्धी बरंच काही मिळालं. पण माझं आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.”