सोळाव्या वर्षी लग्न, सेल्स गर्लचं काम, अपघातात जीव गमावलेली पवित्रा जयराम कोण होती?
कन्नड आणि तेलुगू मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पवित्रा जयरामचं रविवारी कार अपघातात निधन झालं. हा अपघात इतका भीषण होता की पवित्राने जागीच तिचा जीव गमावला. ती बेंगळुरूहून हैदराबादला जात होती.
कन्नड आणि तेलुगू मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयरामचं कार अपघातात निधन झालं. तेलंगणामधील मेहबुबनगर जिल्ह्यात हा अपघात झाला होता. पवित्राच्या कारचा अपघात इतका भीषण होता की जागीच तिचा जीव गेला. पवित्रा बेंगळुरूहून हैदराबादला जाताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पवित्राच्या निधनामुळे दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककला पसरली आहे. पवित्रा ही तेलुगू आणि कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती.
पवित्राचा जन्म कर्नाटकात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची खूप आवड होती. अभिनयक्षेत्रात काम करण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं आणि कन्नड टीव्ही इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पवित्राने 2009 मध्ये करिअरची सुरुवात केली होती. ‘जोकली’ या मालिकेतून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिने ‘रोबो फॅमिली’, ‘गलीपाटा’, ‘चंद्र चकोरी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. कन्नडसोबतच पवित्राने तेलुगू मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 2018 मध्ये तिने पहिल्यांदा ‘निन्ने पिल्लडथा’ या तेलुगू मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ‘त्रिनारायणी’ आणि ‘स्वर्ण पॅलेस’मध्ये ती झळकली होती.
View this post on Instagram
पवित्राने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘बुच्चीनायडू कन्नडिगा’ (तेलुगू), ‘मेलोब्बा मायावी’ (कन्नड) आणि ‘मंजरी’ (कन्नड) या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी पवित्राला बराच संघर्ष करावा लागला होता. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने पवित्राला सहजपणे संधी मिळत नव्हती. अशातच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकली नव्हती. कमी वयातच छोटं-मोठं काम करून तिने कुटुंबाचा गाडा चालवला. हाऊस किपर, सेल्स गर्ल आणि लायब्ररी असिस्टंटसारखी कामं तिने केली होती.
पवित्रा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. तिने अवघ्या 16 व्या वर्षी लग्न केलं होतं. अभिनेत्रीने तिच्या दहावीच्या परीक्षेची तयारीसुद्धा केली होती. परीक्षा दिल्यानंतर ती मुलगा आणि मुलीसोबत बेंगळुरूला शिफ्ट झाली. भूतपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “महबूबनगर जिल्ह्यातील दिविटिपल्ली इथं रविवारी रात्री 1 वाजता पवित्राच्या कारचा अपघात झाला. त्यात तिने जागीच प्राण गमावले. ती बेंगळुरूहून हैदराबादला जात होती. त्यावेळी तिच्या कारचं नियंत्रण सुटलं आणि ती कार दुभाजकाला धडकली. नंतर एका बसने तिच्या कारला धडक दिली.” या अपघातात पवित्राचं निधन झालं तर तिचा चुलत भाऊ आणि ड्राइव्हर गंभीर जखमी झाले आहेत.