Adipurush | ‘प्रत्येकवेळी हिंदूंच्या संयमाची परीक्षा का?’; हायकोर्टाने ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना फटकारलं
"आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. काही अनुयायी थिएटरमध्ये स्क्रिनिंग बंद पाडायला गेले होते. सुदैवाने त्यांनी फक्त स्क्रिनिंग बंद पाडली. त्यावेळी रागाच्या भरात ते इतरही अनेक गोष्टी करू शकले असते", असंही कोर्टाने म्हटलंय. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.
लखनऊ : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर बंदी आणण्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान अलाहाबाद कोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने निर्मात्यांना जोरदार फटकारलं. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सेन्सॉर बोर्ड) या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलंच कसं, असा सवाल कोर्टाने केला. “हिंदू सहिष्णू आहेत, परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या संयमाची परीक्षा का घेतली जाते”, असाही प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना लखनऊ खंडपीठाने संवादलेखक मनोज मुंतशीर यांनाही नोटीस बजावली आहे.
चित्रपटाच्या डिस्क्लेमरवरून फटकारलं
‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या ‘डिस्क्लेमर’वरून हे रामायण नाही असं स्पष्ट होतंय, असा युक्तिवाद स्वीकारण्यास खंडपीठाने थेट नकार दिला. “जेव्हा निर्मात्यांनी प्रभू श्रीराम, देवी सीता, भगवान लक्ष्मण, भगवान हनुमान, रावण, लंका हे सर्व चित्रपटात दाखवलं असताना ते रामायणातील नाही हे डिस्क्लेमरद्वारे कसं पटवून देतील”, असं न्यायमूर्तींनी नमूद केलं. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्राचं पुनरावलोकन करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे की नाही याविषयी सूचना मागविण्याचे आदेश डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी दिले.
“प्रत्येकवेळी हिंदूंची परीक्षा का घेतली जाते?”
“हिंदू सहिष्ण आहेत, पण प्रत्येक वेळी त्यांची परीक्षा का घेतली जाते? जर हिंदू सुसंस्कृत आहेत, तेव्हा त्यांना दडपून टाकणं योग्य आहे का”, असाही सवाल खंडपीठाने केला आहे. तर हा चित्रपट केवळ भगवान श्रीराम, देवी सीता, भगवान हनुमान यांची पूजा करणाऱ्या लोकांच्या भावनांवरच विपरित परिणाम करत नाही, तर ज्या पद्धतीने त्यांचं चित्रण केलंय, त्यामुळे समाजात गंभीर असंतोष निर्माण होऊ शकतो, असं निरीक्षण याचिकाकर्त्याच्या वकील रंजना अग्निहोत्री यांनी नोंदवलं. त्याचप्रमाणे वाल्मिकींच्या रामायणात किंवा तुलसीदास यांच्या रामचरितमानसमध्ये सांगितलेल्या गोष्टी चित्रपटात त्या पद्धतीने दाखवलं नसल्याचंही याचिकाकर्त्याने म्हटलंय.
चित्रपटाला विरोध होत असला तरी धर्माच्या अनुयायांनी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवली नाही, याकडे खंडपीठाने लक्ष वेधलं. “आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. काही अनुयायी थिएटरमध्ये स्क्रिनिंग बंद पाडायला गेले होते. सुदैवाने त्यांनी फक्त स्क्रिनिंग बंद पाडली. त्यावेळी रागाच्या भरात ते इतरही अनेक गोष्टी करू शकले असते”, असंही कोर्टाने म्हटलंय. याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.
रामायण या महाकाव्यावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने राघव (श्रीराम), क्रिती सनॉनने जानकी (सीता), सनी सिंहने शेष (लक्ष्मण), देवदत्त नागेनं बजरंग (हनुमान) आणि सैफ अली खानने लंकेशची (रावण) भूमिका साकारली. प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला प्रदर्शनानंतर चारही बाजूंनी टीकांचा सामना करावा लागला.