तिच्यावर आमचा राग काढू नका..; गोविंदा-कृष्णा अभिषेकमधील वाद पुन्हा चर्चेत
अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. आता गोविंदाची भाची आरती सिंह लग्नबंधनात अडकत आहे. मात्र तिच्या लग्नाला गोविंदा येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर कश्मीराने मौन सोडलं आहे.
अभिनेता गोविंदाची भाची आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यांत कुठेच गोविंदा दिसले नाहीत. भाचा कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांच्यासोबत गोविंदा आणि त्याची पत्नीचा वाद सुरू आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसमोर येणं टाळतात. अनेकदा सोशल मीडिया आणि मुलाखतींमध्ये कश्मीरा आणि गोविंदाच्या पत्नीने एकमेकांना टोमणे मारले. त्यामुळे आरतीच्या लग्नाला ते उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कश्मीराने उत्तर दिलं आहे. “मामाने भाचीच्या लग्नात यावं अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. ते लग्नाला आल्यास मी मनापासून त्यांचं स्वागत करेन”, असं ती म्हणाली.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरा पुढे म्हणाला, “त्यांची आमच्यावर नाराजी असू शकते पण आरतीवर त्यांचा कोणताच राग नाही. हे लग्नसुद्धा कृष्णाचं नाही. त्यामुळे ते आमच्या लग्नात आले नसते तर मी समजू शकले असते की ते आमच्यावर नाराज आहेत. पण त्यांनी लग्नाला यावं अशी आरतीची मनापासून इच्छा आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या लग्नाला यावं. हे तिचं लग्न आहे आणि तिच्यावर त्यांनी कोणताच राग काढू नये.”
View this post on Instagram
“संपूर्ण कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू. मी त्यांची सून आहे. लग्नात आल्यास एक सून म्हणून मी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेईन. आमच्यात जो काही वाद झाला, त्याचं आरतीशी काहीच देणं-घेणं नाही. कुटुंबात असे छोटे-मोठे वाद होत राहतात. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही”, असं तिने पुढे सांगितलं.
एका मुलाखतीत आरतीने सांगितलं होतं की गोविंदाने तिच्यासोबतही बोलणं बंद केलं आहे. “त्यांच्यात जे काही भांडण झालं, त्याचा फटका मलाही बसला आहे. चीची मामा आणि त्यांचे कुटुंबीय माझ्यासीशी बोलत नाहीत”, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली होती. आरती सिंह ही मुंबईतील बिझनेसमन दीपक चौहानशी लग्न करतेय. या दोघांचं लग्न येत्या 25 एप्रिल रोजी आहे. 22 एप्रिल रोजी आरतीचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमात इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते.