मुंबई : 20 नोव्हेंबर 2023 | वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दहा सामने जिंकल्यानंतर फायनल मॅचमध्ये टीम इंडियाला जेतेपद पटकावता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी बाजू उलटवली आणि सहाव्यांदा त्यांनी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. रविवारी संपूर्ण देशभराचं या अंतिम सामन्याकडे लक्ष लागलं होतं. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होते. यादरम्यान माजी क्रिकेटर हरभजन सिंग याने अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांच्याबद्दल वादगस्त विधान केलं. हरभजनच्या या वक्तव्यावरून त्याला चांगलंच ट्रोल केलं जातंय.
कॉमेंट्री करताना हरभजनने विराट कोहलीची पत्नी अनुष्का आणि केएल राहुलची पत्नी अथिया यांच्याबद्दल टिप्पणी केली. मॅचदरम्यान जेव्हा कॅमेरा अनुष्का आणि अथियाकडे फिरला, तेव्हा दोघीजणी एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसल्या होत्या. यावर कॉमेंट्री करताना हरभजन म्हणाला, “मला असं वाटतंय की कदाचित या दोघी चित्रपटांविषयी गप्पा मारत असतील. कारण अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांना क्रिकेटविषयी फारसं काही समजत नसेल” त्याच्या याच वक्तव्यांवरून नेटकऱ्यांनी ट्रोलिंग करण्यात सुरुवात केली. ‘महिलांना क्रिकेट समजत नाही, असं तुला म्हणायचं आहे का? या वक्तव्यावर ताबडतोब माफी माग’, असं एकाने लिहिलं. तर ‘हरभजन सिंगने केलेलं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
@harbhajan_singh What do you mean that the ladies understand cricket or not?? Please apologise immediately. @AnushkaSharma@theathiyashetty@klrahul@imVkohli#INDvsAUSfinal #INDvAUS #ICCWorldCupFinal pic.twitter.com/8gKlG8WvJP
— Arunodaya Singh (@ArunodayaSingh3) November 19, 2023
Typical Harbhajan Singh L. Disgrace as a person. “Filmo ki baat ho rahi hogi ya cricket ki- Pata nahi cricket ki kitni samaj hogi.
Pathetic. pic.twitter.com/oUhxG13aFS
— Areyyyyy Yaarrrrrr (@A_niche11) November 19, 2023
हरभजनच्या या वक्तव्यावर अद्याप अनुष्का किंवा अथियाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनलचा सामना झाला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 6 विकेटने हरवून वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे आज प्रत्येक क्रिकेटप्रेमी निराश आहे. टीम इंडियाने फक्त 240 धावा केल्या. भारतीय फलंदाज चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्यात अपयशी ठरले. त्याची किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली. ऑस्ट्रेलियाने फक्त 4 विकेट गमावून आरामात विजयी लक्ष्य गाठलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.