यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाच्या नावाचा अर्थ खूपच खास
अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी यामीने मुलाला जन्म दिला. त्याबद्दलची पोस्ट लिहित तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री यामी गौतमने ‘गुड न्यूज’ दिली आहे. 20 मे रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी यामीने मुलाला जन्म दिला. आता सोशल मीडियावर पोस्ट लिहित यामीने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. त्याचप्रमाणे मुलाचं नावसुद्धा तिने या पोस्टद्वारे सांगितलं आहे. यामीने 2021 मध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केलं. यामी आणि आदित्यने त्यांच्या मुलाचं नाव ‘वेदाविद’ (Vedavid) असं ठेवलंय. हे एक संस्कृत नाव असून वेद (Veda) आणि विद (Vid) या शब्दांनी मिळून बनलं आहे.
वेदाविद या नावाचा अर्थ म्हणजे वेदांचं ज्ञान असणारा. हे विष्णुचंही एक नाव आहे. यामी आणि आदित्यने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘सूर्या हॉस्पीटलमधील डॉक्टरांचं आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करत असताना आम्हाला आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आतुरत आहे. भविष्यात जेव्हा तो प्रत्येक मैलाचा दगड गाठेल, तेव्हा तो क्षण आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा असेल.’
View this post on Instagram
यामीच्या या पोस्टवर सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. आयुषमान खुराना, मृणाल ठाकूर, नेहा धुपिया यांनी यामी आणि आदित्यवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामीने ‘आर्टिकल 370 ‘ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. यामी आणि आदित्याने दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जून 2021 मध्ये लग्न केलं. ‘उरी: सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.
यामी गौतमला एका ब्युटी क्रिमच्या जाहिरातीने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आयुष्मान खुरानाच्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातील भूमिकेद्वारे तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यामीने ‘काबिल’, ‘बदलापूर’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘बाला’, ‘भूत पोलीस’, ‘अ थर्स्डे’, ‘दसवी’, ‘चोर निकल के भागा’, ‘ओह माय गॉड 2’, ‘आर्टिकल 370’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.