यश चोप्रा यांनी थेट राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना रुममध्ये केलं बंद अन्..
साथियाँ या चित्रपटाशिवाय यश चोप्रा यांनी राणीसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. 'वीर झारा' हा चित्रपटसुद्धा हिट ठरला होता. राणी लवकरच 'कॉफी विथ करण 8' या चॅट शोमध्ये अभिनेत्री काजोलसोबत येणार आहे. या एपिसोडचा रंजक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
मुंबई : 28 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री राणी मुखर्जीने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘कुछ कुछ होता है’, ‘ब्लॅक’, ‘मर्दानी’ यांसारखे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. राणीने दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राशी लग्न केलं. बॉलिवूडमध्ये राणीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र यासाठी तिलाही बराच संघर्ष करावा लागला. एका मुलाखतीत राणीने यश चोप्रा यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला. यश चोप्रा यांनी दिलेल्या चित्रपटाची ऑफर नाकारल्यानंतर त्यांनी राणीच्या पालकांना थेट एका रुममध्ये बंद केलं होतं. जोपर्यंत ती होकार देणार नाही, तोपर्यंत त्यांनी राणी आई-वडिलांना रुममध्ये बंद केलं होतं.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत राणीने हा किस्सा सांगितला. ‘मुझसे दोस्ती करोगी’ हा राणीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यामध्ये तिच्यासोबत हृतिक रोशन, करीना कपूर आणि उदय चोप्रा यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटानंतर राणीचं करिअर संपलं, असंच चित्रपट समीक्षक म्हणू लागले होते. याविषयी राणी म्हणाली, “त्यावेळी मी कामाला नकार देत होते. मी जणू वेडीच झाले होते असं माझ्या आईला वाटत होतं. कारण मी प्रत्येक चित्रपटाच्या ऑफरला नकार देत होते. मी फक्त घरी बसून राहायचे.”
त्यावेळी यश चोप्रा यांनी राणी मुखर्जीला ‘साथियाँ’ची ऑफर दिली होती. मात्र या चित्रपटालाही सुरुवातीला राणीने नकार दिला. तिचा होकार मिळवण्यासाठी यश चोप्रा यांनी थेट तिच्या आईवडिलांना रुममध्ये बंद केलं होतं. “त्यावेळी अनेक चित्रपट समीक्षकांनी आणि मासिकांमध्ये माझ्याबद्दल नकारात्मक लिहिलं जात होतं. तिचं करिअर संपुष्टात आलंय असं ते लिहित होते. मीसुद्धा कुठेतरी त्यांच्याशी सहमत होते. कदाचित ते योग्य असतील पण मी हार मानणार नाही असं ठरवलं होतं. माझ्या हृदयाला जी गोष्ट भावणार, त्यातच काम करणार असल्याचा निर्णय मी घेतला होता. त्यावेळी सुदैवाने मला साथियाँची ऑफर मिळाली”, असं राणीने सांगितलं.
“यश चोप्रा यांनी माझ्या पालकांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. हा चित्रपट करण्यात राणीला रस नाही, असं ते सांगणार होते. त्यावेळी यश अंकलने मला कॉल केला आणि म्हणाले, बेटा तू खूप मोठी चूक करतेय. मी माझ्या रुममध्ये तुझ्या आईवडिलांना बंद करतोय आणि तू होकार देईपर्यंत मी त्यांना बाहेर जाऊ देणार नाही. अखेर मी त्यांचं ऐकून चित्रपटाला होकार दिला. त्यावेळी त्यांनी जे काही केलं, त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे”, अशा शब्दांत राणी व्यक्त झाली.