युट्यूबर अरमान मलिकच्या घरी हलला पाळणा; दुसऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं.

युट्यूबर अरमान मलिकच्या घरी हलला पाळणा; दुसऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म
Armaan Malik
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2023 | 1:31 PM

हैदराबाद : प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकने फॉलोअर्सना गुड न्यूज दिली आहे. अरमानच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका या एकत्र गरोदर आहेत. त्यापैकी कृतिकाने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. अरमानने पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. मात्र कृतिकाने मुलाला जन्म दिला की मुलीला हे अद्याप त्याने स्पष्ट केलं नाही. कृतिका आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठीक असल्याचं अरमानने सांगितलं आहे. आई होण्यापर्यंतचा कृतिकाचा प्रवास फारच कठीण होता. कारण याआधी तीन वेळा तिचा गर्भपात झाला होता. याविषयी ती एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली होती.

कृतिका आई झाल्याचं कळताच फॉलोअर्सकडून अरमान आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अरमानच्या दोन्ही पत्नींनी जेव्हा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली होती. या दोघांसोबतचे फोटोसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता कृतिकानंतर पायलसुद्धा लवकरच जुळ्या बाळांना जन्म देणार आहे.

कोण आहे अरमान मलिक?

अरमान हा हैदराबादमधील प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियावर त्याचे पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो नेटकऱ्यांचं मनोरंजन करतो. 2011 मध्ये त्याने पायलशी लग्न केलं. या दोघांना चिरायू हा मुलगा आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्याने कृतिकाशी लग्न केलं. कृतिका ही पायलची खास मैत्रीण असल्याचंही म्हटलं जातं. दुसरं लग्न झाल्यानंतरही हे चौघं एकाच घरात एकत्र राहत आहेत. पायल आणि कृतिका यांचे अनेकदा एकत्र फोटो पहायला मिळतात.

अरमान त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अरमानचं खरं नाव संदीप असं आहे. त्याने जेव्हा आपल्या दोन लग्नांविषयी युट्यूबवर सांगितलं, तेव्हापासून तो रातोरात प्रकाशझोतात आला. प्रसिद्ध गायक अरमान मलिकने या नावावरून आक्षेप घेतला होता. ‘मीडियामध्ये त्याला अरमान मलिक बोलणं थांबवा. त्याचं खरं नाव संदीप आहे. कृपया माझ्या नावाचा गैरवापर करू नका. रोज सकाळी उठून असे आर्टिकल वाचण्याचा मला राग येतोय. अशा बातम्यांमुळे माझी खूप चिडचिड होतेय’, असं ट्विट गायक अरमान मलिकने केलं होतं.