Migraine Cure : बदलत्या ऋतूनुसार तुम्हालाही सतावतो मायग्रेनचा त्रास ? ‘हे’ उपाय करून तर पहा
तापमान, आर्द्रता, बॅरोमेट्रिक दाब आणि हवामानाशी संबंधित इतर घटकांमुळे डोकेदुखी सुरू होते, असे मत अनेक मायग्रेन पीडितांनी नोंदवले आहे. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर काही टिप्स फॉल करून तुम्ही मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवू शकता.
नवी दिल्ली : हवामानात होणारे बदल, तसेच धूळ, माती, प्रदूषण याचा आपल्या आरोग्यावर नकळतपणे परिणाम होत असतो. काही लोकांची तर यामुळे तब्येतही अनेकवेळा बिघडते व त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांचा (health problems) सामना करावा लागतो, हे खूप सामान्य झाले आहे. पण बदलत्या हवामानामुळे काही लोकांना मायग्रेनचा (migraine) त्रास होतो. तापमान, आर्द्रता, बॅरोमेट्रिक दाब आणि हवामानाशी संबंधित इतर घटकांमुळे डोकेदुखी सुरू होते, असे मत अनेक मायग्रेन पीडितांनी (migraine patients) नोंदवले आहे. मात्र असे असले तरीही मायग्रेन ट्रिगर करण्यामागील हवामानाशी संबंधित नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत अद्याप कोणताही ठोस अभ्यास अद्याप समोर आलेला नाही. मायग्रेनची ही समस्या व्यक्तीनुसार बदलू शकते.
काही अभ्यासांद्वारे असे सुचवण्यात आले आहे की बॅरोमेट्रिक दाब आणि तापमानातील बदलांमुळे मेंदूतील रक्त प्रवाहात बदल होऊ शकतो, परिणामी मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. तर इतर अभ्यासांतून असे सुचवले आहे की सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या विशिष्ट न्यूरोट्रांसमीटरच्या पातळीतील बदलांचा समावेश असू शकतो. ऋतूमानातील बदलामुळे होणारा मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात, ते जाणून घेऊया.
मायग्रेन थांबवण्यासाठी काही टिप्स –
स्ट्रेस मॅनेजमेंट : मायग्रेनचे दुखणे वाढवणाऱ्या एका सामान्य व प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे तणाव. ताण-तणावामुळे डोकेदुखी वाढू शकते तसेच ती वांरवार उद्भव शकते. म्हणूनच योग, ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छवास यांसारखे तणाव व्यवस्थापन तंत्रांचा अथवा व्यायामाचा सराव केल्याने मायग्रेनपासून आराम मिळू शकतो.
गॉगल अथवा सनग्लासेस घाला : उन्हाळ्याच्या दिवसात तेजस्वी सूर्यप्रकाशामुळे काही लोकांना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. प्रखर उन्हामुळे डोळ्यांवर थेट परिणाम होतो, ही जोखीम कमी करण्यासाठी गॉगल, सनग्लासेस किंवा डोक संपूर्ण झाकलं जाईल व डोळ्यांवरही फार ऊन येणार नाही अशी टोपी घातल्याने आराम मिळू शकतो.
मायग्रेनची नोंद ठेवा : जेव्हा तुमचा मायग्रेन ट्रिगर होतो तेव्हा त्यावेळी असलेल्या हवामानाची नोंद ठेवावी. यामुळे तुमचं मायग्रेन कधी वाढतं. डोकेदुखी नेमकी कधी सुरू होते हे ओळखून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मदत होऊ शकते.
हायड्रेटेड रहा : डिहायड्रेशनमुळे मायग्रेन होऊ शकतो, म्हणून भरपूर पाणी प्यायले जाईल याची खात्री करा. विशेषतः उष्ण आणि दमट हवामानात असताना दिवसभरात पुरेसे पाणी पोटात गेलेच पाहिजे.
नियमित, शांत झोप घ्या : हवामानातील बदलामुळे झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे मायग्रेन होऊ शकते. दररोज रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच रात्री शांत व पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. नियमितपणे चांगली झोप घेतल्याने तुमच्या एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. प्रौढ व्यक्तींनी किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक असते.