Tips to identify adulterated food: भेसळयुक्त पदार्थ खाल्याने किडनी व लिव्हरला येऊ शकते सूज
भेसळयुक्त पदार्थांमध्ये रासायनिक घटक मिसळलेले असतात, ते जेव्हा रक्तात मिसळतात तेव्हा परिस्थिती आणखीनच खराब होते. गर्भवती महिलांनी जास्त काळजी घेणे आवश्यक असते.
सणा-सुदीचे दिवस जवळ आले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने अनेक पदार्थ, मिठाई (sweets) खाल्ली जाते. काही पदार्थ घरी बनवले जातात तर काही बाहेरून आणले जातात. मात्र बाहेरून आणलेल्या मिठाईमध्ये भेसळ (adulterated food) असू शकते. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर व किडनीवर वाईट परिणाम होतो. किडनी आणि लिव्हरला सूज आल्याने (swelling in kidney) मेंदूवर परिणाम होऊ लागतो.
सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. जुगल किशोर यांच्या सांगण्यानुसार, भेसळयुक्त अन्नाचा सर्वात पहिला परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. भेसळयुक्त पदार्थांमध्ये रासायनिक पदार्थ आढळतात. मात्र ते रक्तात सापडल्यावर परिस्थिती अधिकच बिघडते. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
डॉ. किशोर यांच्या सांगण्यानुसार, भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने तोंड, मोठ्या आतड्यापासून ते किडनीपर्यंत जळजळ होते. सूज येते, कधीतरी रक्तस्त्रावरही होतो. उलट्या, जुलाब, डोकं दुखणं, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागतात. एवढंच नव्हे तर कावीळ आणि टायफॉइडही होऊ शकते. लघवीच्या वेळेस जळजळ होण्याचा त्रासही होऊ शकतो.
भेसळयुक्त पदार्थ ओळखणे कठीण – भेसळयुक्त अन्न ओळखणे कठीण असल्याचे डॉ. किशोर यांनी नमूद केले. पण तुम्हाला एखाद्या पदार्थाची चव नेहमीपेक्षा वेगळी वाटत असेल तर त्यामध्ये भेसळ झाल्याचे समजावे. याबाबत काहीही विचित्र वाटले किंवा शंका आली तर त्यासंदर्भात तक्रार जरूर करावी. सणासुदीच्या काळात गोडधोड खाणं तसेच बाहेरचं जेवण करणं टाळावे. अशा वेळी एखाद्या व्यक्तीला फळे भेट द्यावीत.
भेसळयुक्त पदार्थ खाल्याची प्रमुख लक्षणे –
– अचानक पोटदुखी सुरू होणे.
– पचन तंत्र अचानक खराब होणे.
– डोकेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळणे.
– आतड्यांमध्ये वेदना सुरू होणे.
– अतिसार व उलट्या होणे.
भेसळयुक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्याने काय परिणाम होतात – इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील फूड एक्सपर्ट प्रोफेसर चार्ल्स स्पेन्स यांच्या सांगण्यानुसार, आपण जे अन्न पदार्थ खातो, त्यात असणारी तत्वं आपल्या रक्तात जातात. अन्नात भेसळ असेल तर त्यात असलेले दूषित घटक रक्तातून शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतात, त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.
किडनी – भेसळयुक्त पदार्थ रक्ताद्वारे शरीरात गेल्यास त्याला रक्तापासून वेगळे करण्याचे काम किडनी करते. मात्र भेसळयुक्त पदार्थातील हानिकारक घटक किडनीच्या आतील भागाला हानी पोहोचवतात.
पोट – भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट आणि आतड्यांचे नुकसान होते. रसायने आणि दूषित घटक हे पोटासह आतड्यांच्या बाहेरील आणि आतील भिंतींना हानी पोहोचवण्याचे काम करतात.
हृदय- शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम हृदयाचे असते. भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने दूषित घटक रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचतात. हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
मेंदू- भेसळयुक्त पदार्थांमुळे मेंदूचे होणारे नुकसान लगेच लक्षात येत नाही. हळूहळू त्याची लक्षणे त्या व्यक्तीमध्ये चक्कर येण्याच्या स्वरूपात दिसू लागतात.
आपण स्वत: तपासू शकतो भेसळ –
1) दूध – एका सपाट पृष्ठभागावर दुधाचे 1-2 थेंब टाकावेत . दूध सहज वाहिले व पाण्यासारखी रेष उमटली तर त्यात भेसळ आहे हे समजावे.
2) डाळी – एक चमचा डाळीमध्ये एक चमचा पाणी व हायड्रोक्लोरिक ॲसिडचे काही थेंब टाकावेत. त्यात रंग मिसळला असल्यास तो बाहेर येईल.
3) तूप – एक चमचा तूपामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा आयोडीन घाला. रंग बदलला तर तुपात भेसळ असण्याची शक्यता आहे.
4) हळद – हळदीमध्ये पाण्याचे पाच थेंब आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचे पाच थेंब मिसळा. पावडर भेसळयुक्त असेल तर त्याचा रंग जांभळा किंवा गुलाबी होईल.
5) साखर – एक कप पाण्यात दोन चमचे साखर गरम करा. त्यात खडूची पावडर असेल तर ती खाली दिसायला लागेल.
6) तेल – थोड्या खाद्यतेलात नायट्रिक ॲसिडचे थेंब टाकून ढवळून घ्या. जर तेल फिकट तपकिरी रंगाचे असेल तर त्यामध्ये भेसळ आहे हे समजावे.