तेलकट पदार्थ खूप खाल्लेत ? करा केवळ ‘हे’ उपाय, अपचन, गॅसेसचा होणार नाही त्रास
बऱ्याच वेळेस जास्त तेलकट पदार्थ खाल्याने पोट फुगतं. अपचन आणि गॅसेसचा त्रास होऊ लागतो. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर हे उपाय करुन पहा.
नवी दिल्ली – अनेक वेळा लोकं एखादे फंक्शन, पार्टी किंवा लग्नात जास्त तेलकट पदार्थ (oily food) खातात. जेवण आवडलं म्हणून दोन घास जास्तीचे खाल्ले जातात. हे पदार्थ चविष्ट तर असतात पण त्यामुळे पोटात गॅस (gases) तयार होतो. तसेच पोट फुगणे, अपचन होणे, (indigestion) आंबट-करपट ढेकर येणे, असा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला परत कुठलाच पदार्थ खायची इच्छा होत नाही. तुम्हालाही कधी असा त्रास होतो का ? तसं असेल तर पुढल्या वेळेस तेलकट पदार्थ खाल्यानंतर काही उपाय करून पहा. यामुळे तुमचा त्रास (stomach problem) कमी होऊ शकेल.
पण जास्त तेलकट पदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असते. जास्त तेलकट अन्न खाल्ल्याने गॅसेस, अपचन, पोट आणि छातीत जळजळ होणे असे त्रास तर होतातच, त्याशिवाय हृदय आणि यकृताचे नुकसानही होते. तेलकट पदार्थांमध्ये कॅलरीज, ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, टाइप-2 मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या किंवा आजार उद्भवू शकतात. मात्र काही उपायांच्या मदतीने तेलकट पदार्थ खाल्यानंतर होणारा त्रास कमी करता येतो. पुढल्या वेळेस जर तुम्ही तेलकट पदार्थ खाल्ले, तर काही महत्त्वाच्या गोष्टी पाळा.
तेलकट पदार्थ खाल्यावर काय काळजी घ्यावी ?
कोमट पाणी प्यावे
जर तुम्ही जास्त तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर अनेक वेळा अपचन, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, गॅस इत्यादी समस्या निर्माण होतात.तुम्हालाही असा त्रास झाला तर लगेच कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते. पाणी पोटाला थंडावा देते. जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तर लहान आतडे अन्न नीट पचवू शकत नाही. अनेक वेळा जास्त तेलकट आणि जंक फूड खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. कोमट पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होते, पोट साफ राहते.
शतपावली केल्याने मिळेल आराम
जर तुम्ही जास्त पदार्थ खाल्ले असतील व त्यामुळे त्रास होत असेल तर थोडा वेळ फेऱ्या माराव्यात किंवा चालायला जावे. जास्त जड जेवण किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोट जड होते. चालण्याने आपली पचनशक्ती सुधारते. पचन सुधारण्यासाठी 15 ते 30 मिनिटे चालावे. केवळ तेलकट पदार्थ खाल्यवरच नव्हे तर रोजच्या जेवणानंतरही 15 मिनिटे चालल्यास किंवा फेऱ्या मारल्यास पचनसंस्था आणि आतडे सक्रिय राहण्यास मदत होते. पचन सुधारते व पोटाला त्रास होत नाही.
प्रोबायोटिक्स सेवन करा
प्रोबायोटिक्स युक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रोबायोटिक्स युक्त दह्याचे दररोज सेवन करा. तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्रास होत असेल तर एक वाटी दही खा. त्याने पोटाला आराम मिळेल.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)