नवजात बालकांना प्रदूषणाचा धोका; कशी घ्याल काळजी? डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
महानगरांमध्ये प्रदूषण इतके वाढले आहे की लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना श्वास घेणे कठीण झाले. या प्रदूषणाचा लहानपणापासून मोठ्यांवर गंभीर परिणाम दिसून येतो. या काळात लहान मुलांची कशी काळजी घ्याल? याचीही माहिती आपण घेणार आहोत.
Healthcare Tips : सध्या सगळीकडे प्रदूषणाची समस्या खूप वाढली आहे. प्रदूषणामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. महानगरांमध्ये प्रदूषण इतके वाढले आहे की लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना श्वास घेणे कठीण झाले. या प्रदूषणाचा गंभीर परिणाम सर्वांवर दिसून येतो. तर लहान मुलांनाही याचा जास्त त्रास होऊ शकतो. यामुळे नवजात बालकांच्या बाबतीत डॉक्टरांनी प्रदूषणाच्या काळामध्ये अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
नवजात मुलांसाठी बाहेरचे वातावरण फारच वेगळे असते. त्यांना जन्मानंतर बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. याठिकाणी अतिउष्म, थंडी किंवा प्रदूषण अशा प्रत्येक गोष्टींचा मुलांवर फार लवकर परिणाम होतो.
कशी घ्याल काळजी?
तज्ज्ञांच्या मते, या प्रदूषणाच्या काळात नवजात बाळांसह आईनेही विशेष काळजी घ्यावी. स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनपान चालू ठेवावे. जर मुलाला सर्दी असेल तर आपले हात स्वच्छ धुवून त्याला स्तनपान द्यावे. आईचे दूध हे मुलांसाठी अमृता समान असते. यामुळे बाळ संसर्गाच्या धोक्यापासून वाचू शकते. यामुळे मुलांची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि मूलं सहजासहजी आजारी पडत नाही.
धुम्रपान टाळा : या काळात मुलांच्या आसपास कोणीही धूम्रपान करू नये, हे लक्षात ठेवा. धुम्रपानाच्या धुरामुळे मुलांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात धुम्रपान करणे टाळा.
मुलांना घराबाहेर काढू नका : अगदी गरज असेल तर लहान मुलांना घराबाहेर न्या, असे डॉक्टर अनेकदा सांगतात. लहान मुलांना शक्यतो घरातच ठेवा गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळा.
घरात स्वच्छता ठेवा : घरात लहान मुलं असेल, तर घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. घरात जास्त धूळ साचू देऊ नका आणि बेड नेहमी स्वच्छ ठेवा.
एअर प्युरीफायरचा वापर करा : लहान मुलांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही एअर प्युरिफायर देखील वापरू शकता. यामुळे घरातील वातावरण स्वच्छ होते जेणेकरून मुलांना स्वच्छ हवेचा श्वास घेता येतो.