Air Pollution: प्रदूषणामुळे वाढत आहे वंध्यत्वाची समस्या, महिलांसह पुरूषांवरही होतोय परिणाम
प्रदूषित हवेत असलेल्या धोकादायक रसायनांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे ही रसायने शरीरात पोहोचून एस्ट्रोजन व टेस्टॉस्टेरॉन सारख्या महत्वाच्या हार्मोन्समध्ये मिसळत आहेत.
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह एनसीआरच्या अनेक भागात वायू प्रदूषण (air pollution) गंभीर श्रेणीत पोहोचले आहे. प्रदूषणामुळे लोकांना अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांचा (side effects on health) सामना करावा लागत आहे. मात्र या प्रदूषणाचा परिणाम लोकांच्या प्रजनन क्षमतेवरही (fertility) होत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? अशा वातावरणाचा परिणाम लोकांच्या लैंगिक जीवनावर होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांच्या मते , वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांमुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. प्रदूषणामुळे पुरूषांचे स्पर्म काऊंटही ( शूक्राणूंची संख्या) सातत्याने कमी होत आहे. याबाबत वेळीच खबरदारी घेतली नाही तर येत्या काही वर्षांत परिस्थिती अधिक बिकट होईल, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढेल.
हवेमध्ये अनेक जड घटक असतात, ज्यांचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या हार्मोन्सवर होतो, अशी माहिती गुंजन आयव्हीएफ वर्ल्ड ग्रुपचे संस्थापक आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. गुंजन गुप्ता गोविल यांनी दिली. भारतात 15 टक्के पुरुष हे वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. हे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक आहे. पर्टिक्युलेट मॅटर 2.5 (pm2.5)हे आपल्यासोबत पॉलिसायकलिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन वाहून नेतो. त्यामध्ये शिसे, कॅडमिअम आणि पारा असतात, जे हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करतात आणि पुरुषांच्या शुक्राणूंसाठी हानिकारक ठरतात. अनेक प्रकरणांमध्ये , प्रदूषणामुळे टेस्टोस्टेरॉन किंवा एस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने लैंगिक संबंध ठेवण्याची लोकांची इच्छा कमी होते. प्रदूषणामुळे स्पर्म काऊंटही कमी होतो.
अनेक रसायने आरोग्यासाठी नुकसानकारक
प्रदूषणात श्वास घेतल्यामुळे रक्तात अधिक फ्री रॅडिकल्स जमा होतात, असे डॉ. गुंजन यांनी सांगितले. यामुळे निरोगी पुरुषामध्येही शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते. प्रदूषित हवेमध्ये असणारी क्लोरीन आणि डीडीटीसारखी रसायने आपले आरोग्य बिघडवत आहेत, ही रसायने आपल्या शरीरात पोहोचतात आणि एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनसारख्या महत्त्वाच्या हार्मोन्समध्ये मिसळतात.
एस्ट्रोजन हे महिलांसाठी अत्यंत महत्वाचे हार्मोन आहे. याची निर्मिती अंडाशयामध्ये होते व त्यानंतर ते रक्तात मिसळून शरीराच्या पुनरुत्पादक अवयवांवर परिणाम करते. एस्ट्रोजन हे इतके प्रभावी आहे की, त्याच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये अनेक शारीरिक आणि भावनिक बदल घडू लागतात. या हार्मोनच्या अभावामुळे शारीरिक संबंधही कमी होतात. याच प्रकारे टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाचेही नुकसान होत आहे.
अशी घ्या आरोग्याची काळजी
– जास्तीत जास्त पाणी प्यावे. त्यामुळे श्वसनमार्ग व फुप्फुसातील दूळ साफ होण्यास मदत होते.
– सतत डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास अशा समस्या उद्भवत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
– बाहेर जाताना मास्क लावा
– घराच्या आत झाडे लावू नका, त्याऐवजी एअर प्युरिफायरचा वापर करावा.