Cold, Cough in Winter: तुम्हालाही थंडीत होते वारंवार सर्दी ? हे असू शकते कारण
थंडी सुरू होताच सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मात्र हे असे का होते हे माहीत आहे का ?
नवी दिल्ली – झपाट्याने वाढणाऱ्या थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाचे (cough and cold) रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हे प्रकार जगभरात दिसून येत आहे, ज्यामध्ये फ्लूसारख्या आजारांची प्रकरणेही वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण (corona) वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. तसेच वाढत्या प्रदूषणामुळे (pollution) ॲलर्जी होऊन खोकलाही वाढत आहे. घरात राहिल्यामुळे होणारा ताण, झोप न लागणे आणि रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव ही देखील हिवाळ्यात सर्दी-खोकला होण्याची कारणे आहेत.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातच सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोविड अनुकूल व्यवहार अथवा नियम न पाळणे हे यामागचे कारण असू शकते. मास्क न लावणे, गर्दीत फिरणे यासारख्या सवयींमुळे हा त्रास होऊ शकतो. तसेच इतरही अनेक कारणांमुळे सर्दी- खोकला होऊ शकतो.
धूम्रपान – तुम्ही जर सिगारेट किंवा बिडी वगैरे ओढत असाल तर ते लवकरात लवकर बंद करावे. सिगारेट ओढल्याने, धूम्रपान केल्याने तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे निरोगी जीवन जगायचे असेल तर धूम्रपान सोडावे.
वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या– तुम्हाला वारंवार सर्दी आणि खोकला होतो का? जर असं असेल तर वैयक्तिक स्वच्छतेची नीट काळजी घ्या. हात नेहमी स्वच्छ ठेवावेत. खोकताना किंवा शिंकताना नाका- तोडांवर हात ठेवावा आणि नंतर लगेच हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत.
ताण – तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर आपल्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे तुमची मनःशांती बिघडू शकते. तसेच तणावामुळे तुमची रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
झोप पूर्ण न होणे – झोप पूर्ण झाली नाही तर ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? कमकुवत प्रतिकारकशक्तीमुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच रात्री शांत आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
थंडीत घरात बसून राहणे – थंडीत बाहेरचे तापमान कमी असते, अशा परिस्थितीत लोक जास्त वेळ घरात घालवतात. पण तुम्हाला माहित आहे का की थंडीत प्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे थोडा वेळ बाहेर पडावे, उन्हात थोडा वेळ बसावे.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)