कोरोनाची दस्तक… मुंबई महापालिकेचा ‘या’ रुग्णांना काळजी घेण्याचा सल्ला

| Updated on: Dec 21, 2023 | 5:24 PM

देशभरात कोरोनाचा नव्या व्हेरिएंटने खळबळ उडवून दिली आहे. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला आहे. पुण्यात या व्हेरिएंटचा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. मागच्यावेळीही पुण्यातच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यामुळे पुणे असो की मुंबई की नाशिक... प्रत्येक महापालिकेने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

कोरोनाची दस्तक... मुंबई महापालिकेचा या रुग्णांना काळजी घेण्याचा सल्ला
coronavirus
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 21 डिसेंबर 2023 : कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा जेएन-1 हा नवा व्हेरिएंट आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. नवा व्हेरिएंट घातक आहे का? त्याचा धोका किती आहे? त्यामुळे काय होऊ शकते? नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावं लागेल का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. मुंबई महापालिकेनेही या नव्या व्हेरिएंटची दखल घेतली असून काही सूचनाही केल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या व्हेरिएंटबाबतची माहिती दिली. हा व्हेरियंट ओमिक्रॉनचा आहे. JN1 हा व्हेरिएंट माईल्ड प्रकाराचा आहे. व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कालच पालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेवून काही सूचना केल्या आहेत, अशी माहिती दक्षा शाह यांनी दिली.

चाचण्या वाढवणार

प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. दवाखाने आणि मोठे हॉस्पिटल यांनाही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार लोक मास्कचा वापर करू शकतात, असं दक्षा शाह यांनी स्पष्ट केलं.

विशेष काळजी घ्या

यावेळी त्यांनी काही रुग्णांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, तसेच मधूमेह आहे, अशा रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असं शाह यांनी सांगितलं. कोरोना परिस्थिती आणि व्यवस्थेचा आढावा घेतला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पॅनिक होऊ नका

ऑक्सिजन बेड्स, आयसीयू तसेच इतर यंत्रणा तयार आहेत. आम्ही वारंवार सूचना आणि मार्गदर्शन घेत आहोत. हा व्हेरिएंट सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही. लोकांनी पॅनिक होऊ नये योग्य ती खबरदारी घ्यावी. सद्यस्थितीलाकोरोनाचे 17 सक्रिय रुग्ण आहेत. आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

नाशिकमध्ये काय?

देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर नाशिकमध्ये देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालय तसेच झाकीर हुसेन रुग्णालयात देखील अतिरिक्त बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच इतर यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या बिटको रुग्णालयात 300 आणि डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात 100 असे एकूण 400 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. आवश्यकता वाटल्यास तपासणी देखील केली जाणार असल्याची आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. नागरिकांना घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन, नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले आहेत.