भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळे तब्बल 66 मुलांनी प्राण गमावला? तुम्हीही मुलांना हेच कफ सिरप देताय?
तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना कोणतं कफ सिरप देता, हे पुन्हा एकदा तपासून पाहा! गांबियात कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय
मुंबई : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या कफ सिरपवरुन एक महत्त्वाचा अलर्ट (WHO Alert) जारी केलाय. कफ सिरपमध्ये असलेल्या काही घटकांचं प्रमाण हे लहान मुलांसाठी घातक ठरत असल्याचं दिसून आलंय. भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपवरुन हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत 66 कोवळ्या जिवांच्या मृत्यूला (66 kids died) हे कफ सिरप कारणीभूत ठरल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. त्यानंतर पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय.
गांबिया नावाच्या देशात 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आलीय. या मुलांच्या मृत्यूचं कारण त्यांच्या कीडनीमध्ये झालेला बिघाड असल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप आल्यानंतर लहान मुलांना एक सिरप देण्यात आलं होतं.
या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जे कफ सिरप गांबिया देशातील मुलांना देण्यात आलं होतं, ते भारतीय कंपनीने बनवलेलं होतं.
या सिरपचं वितरण गांबियासोबत इतरही अनेक देशात झालेलं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण चार सिरप बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.
प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.
या सिरपमध्ये डायथायलीन ग्याकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल असल्याचं आढळलंय. याचा लहान मुलांच्या पोटावर आणि कीडनीवर परिणाम होत असल्याचे प्रकार समोर आलेत.
ही कफ सिरप मुलांना देणं टाळा :
- प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन (Promethazine Oral Solution)
- कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup)
- मकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup)
- मॅग्रीम एन कॉल्ड सिपर (Magrip N Cold Syrup)
संशयास्पद चार सिरपमुळे पोटदुखी, उलट्या होणं, लघवीला न होणं, डोकेदुखी, कीडनीचे विकार बळावणं, अशी लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे या सर्व उत्पादनांची तातडीने सखोल चौकशी आणि तपास केला जाईल. तोपर्यंत हे सर्व कफ सिरप असुरक्षित मानले जातील, असं WHO ने म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियालाही सतर्क केलंय. सीडीएससीओकडून या प्रकरणाची गंभीर दखल केण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने तपास केला जाणार असून लोकांनाही याबाबत सतर्क करण्यात आलं आहे. कोणतंही कफ सिरप आपल्या मुलांना देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा, असं आवाहन आता केलं जातंय.